धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या वाघाची एन्ट्री? प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची तब्येत बिघडली! ,

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – येडशी अभयारण्यात दाखल झालेल्या टिपेश्वर येथील वाघाची चर्चा अजून थांबलेली नसताना, आता धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या वाघाच्या उपस्थितीची शक्यता वर्तवली जात आहे. तुळजापूर तालुक्यातील नंदगाव आणि धाराशिव तालुक्यातील सांगवी परिसरात एका वाघाचे दर्शन झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून, वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या प्राण्याची ओळख वाघ म्हणून केली आहे.

वाघ एकच की दुसरा? संभ्रम कायम…

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा वाघ टिपेश्वर येथून आलेला आहे. मात्र बार्शी वनविभागाचे अधिकारी सांगतात की, टिपेश्वरचा वाघ सध्या बार्शी तालुक्यात आहे. त्यामुळे हा सांगवी परिसरात दिसलेला वाघ दुसरा असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

वनविभाग माहिती लपवत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत असून, येडशी अभयारण्यात अधिवास निश्चित केलेला वाघ नागरी आणि ग्रामीण भागातून, दोन राष्ट्रीय महामार्ग ओलांडून थेट तुळजापूर तालुक्यात कसा पोहोचला, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या वाघाची एन्ट्री झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची तब्येत बिघडली

सांगवी शिवारात सोमवारी (दि. १६ जून) वाघाचे दर्शन झाले असून, भक्तराज दहीभाते या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीला वाघ पाहिल्यानंतर भीतीमुळे घबराट झाली आणि तब्येत बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती अस्वस्थच आहे. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन व वैद्यकीय उपचाराची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जागजी परिसरात हालचाल

सांगवी येथे दर्शन दिल्यानंतर वाघाने रेल्वे लाईन ओलांडून जागजी परिसरात प्रवेश केला. या भागात त्याने एका प्राण्याची शिकार केल्याचेही काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे वाघाच्या मॅन हिटर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वनविभागाला इशारा – बंदोबस्त नाही तर आंदोलन

सध्या शेतीची कामे सुरू असल्यामुळे शेतकरी शेतात मुक्काम करत आहेत. अशा परिस्थितीत वाघाकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा पूर्वी स्थगित केलेले आंदोलन पूर्वसूचना न देता 20 दिवसांच्या आत पुन्हा सुरू करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिला आहे.

वाघाला धाराशिव जिल्ह्यात पोषक वातावरण तयार झाले आहे का?

धाराशिव जिल्ह्यात वाघाच्या सतत होणाऱ्या हालचालींमुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो – वाघासाठी इथे पोषक वातावरण तयार झाले आहे का? येडशी अभयारण्याच्या आसपासचा भूभाग, अन्नसाखळीतील प्राणी (हरिण, ससे, डुकरं इ.) व तुलनेत कमी मानवी वस्ती हे घटक वाघासाठी आकर्षक ठरत आहेत का, याचे गांभीर्याने विश्लेषण होणे गरजेचे आहे.

जर वाघ इथे वास्तव्यासाठी येत असेल, तर भविष्यात धाराशिवसारख्या अर्धविकसित वनक्षेत्रात वन्यजीवांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र त्याचबरोबर मानवी वस्ती जवळ असल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचे प्रमाणही वाढण्याचा धोका संभवतो.

त्यामुळे वनविभागाने या घटनेचा केवळ बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून विचार न करता, शास्त्रीय पद्धतीने वाघाच्या हालचालींचा अभ्यास, संभाव्य अधिवास आणि मानवांवरील संभाव्य धोका यांचा आढावा घ्यावा, अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे.

#उस्मानाबादन्यूज
#धाराशिवन्यूज
#धाराशिव
#उस्मानाबाद
#अंतरसंवादन्यूज
#वाघ
#टायगरअलर्ट
#धाराशिववाइल्डलाईफ
#वनविभाग
#TigressInDharashiv


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!