धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव-कळंब नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी स्पष्ट आणि संयमी भूमिका मांडत पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली असून, शिवसैनिक व सहकारी पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे.
या पोस्टद्वारे त्यांनी निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, “लोकशाहीमध्ये जनतेचा कौल अंतिम असतो आणि तो आम्ही पूर्णपणे मान्य करतो,” असे नमूद केले आहे. निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन प्रामाणिकपणे मेहनत घेतली, उमेदवारांनीही आत्मविश्वासाने लढत दिली; मात्र निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही, हे त्यांनी प्रांजळपणे मान्य केले.
“हा निकाल मनाला वेदना देणारा आणि निराशाजनक असला, तरी जनतेच्या निर्णयाबाबत आमच्या मनात कोणताही आक्षेप नाही,” असे सांगत त्यांनी धाराशिव व कळंब शहरातील मतदारांप्रती आदर व्यक्त केला. रस्त्यावर उतरून पक्षासाठी झटणाऱ्या, कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकांना न्याय देण्याची भूमिका आमची होती; मात्र या निकालाचा फटका प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या मनोबलाला बसला असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
या संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वतः स्वीकारत आमदार घाडगे-पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे की, “पराभव हा शेवट नाही. शिवसैनिकांनी आणि सहकारी पक्षातील कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. आपण आत्मचिंतन करू, चुका ओळखू, आवश्यक सुधारणा करू आणि पुन्हा नव्या उमेदीने मैदानात उतरू.”
“संघर्ष हीच आपली ओळख आहे आणि संघर्षातूनच विजयाचा नवा इतिहास घडवू,” असे ठाम शब्दांत सांगत त्यांनी पोस्टचा शेवट “जय महाराष्ट्र” या घोषणेसह केला आहे.
आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून, पराभवानंतरही नेतृत्वाने जबाबदारी स्वीकारत मनोबल वाढवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.