धाराशिव/तुळजापूर :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यांवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी थेट प्रतिक्रिया देत त्यांना सविस्तर व खुलं पत्र पाठवलं आहे. “आपण माझ्या थोरल्या बहिणीसारख्या आहात; पण चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारावर माझ्याविषयी सातत्याने विधानं केली जात आहेत. यात वस्तुनिष्ठता नाही,” असा स्पष्ट आरोप पाटील यांनी पत्रात केला आहे.
सनतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश – “ते तुमचेच नेते होते”
पाटील यांनी पत्रात नमूद केले की,
तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. “या प्रवेशाच्या क्षणापर्यंत ते तुमच्या (सुप्रिया सुळे यांच्या) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरातील प्रमुख नेते होते. त्यांच्यावर आरोप लागल्यानंतर पक्षातून त्यांना काढून टाकण्यात आले नव्हते,” असे त्यांनी ठामपणे म्हटले.
यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार “दोष सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष असते” अशी आठवण करून देत, “तुमच्या सहकारी काही मंत्र्यांवर गंभीर आरोप असतानाही त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यात आले होते,” असा टोला त्यांनी लगावला आहे.
“तुळजापूरची बदनामी होत आहे; तथ्य तपासूनच बोला”
तुळजाभवानी मातेच्या क्षेत्राची बदनामी होईल असे वक्तव्य आपण सलग दोनदा केले, अशी टीका करत पाटील म्हणतात—
“आपण एवढ्या जबाबदारीच्या पदावर असताना, वस्तुनिष्ठ माहिती न घेता केलेले विधान स्थानिकांच्या भावना दुखावणारे आहे.”
ते पुढे म्हणतात की,
विधानसभा निवडणुकीदरम्यान तुळजापूरातील माता-भगिनींनी शहरात सुरू असलेल्या ड्रग्ज कारवायांची माहिती दिली. “मी स्वतः तपास करून ती माहिती तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देण्यासाठी विनोद गांगणे यांना जोडले. त्यांनी पोलिसांना सहकार्य केले, मात्र विचित्रपणे पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच आरोपी बनविले,” अशी गंभीर बाब त्यांनी मांडली.
न्यायालयाने जामीन मंजूर करताना या मुद्द्यांकडे विशेष लक्ष वेधले असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले.
शताब्दी रुग्णालय निविदा प्रकरणाचाही उल्लेख
अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेवर बोलताना पाटील म्हणतात—
“तेरणा ट्रस्टने फक्त सहभाग घेतला. त्याआधी तीन वेळा निविदा काढूनही एकही अर्ज आलेला नव्हता. अशा स्थितीत सहभाग घेतला त्यात चुकीचं काय आहे? हे आपण स्पष्ट करावे.”
“वस्तुनिष्ठ चर्चा करण्यास मी तयार” – पाटील
पत्राच्या शेवटी पाटील यांनी सुळे यांना उद्देशून म्हटले—
“आपल्या शंका अजूनही कायम असल्यास, चर्चा करून सर्व पुरावे, माहिती आणि दस्तऐवजांसह माझी भूमिका स्पष्ट करण्याची माझी तयारी आहे. अशी पत्र फोटो सह फेसबुकवर पोस्ट करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माहिती दिली आहे.”