बारामती | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेनंतर आता एकच प्रश्न चर्चेत आहे — हा अपघात होता की घातपात?
हे विमान मुंबईहून बारामतीकडे येत होते. आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती येथे जात होते. मात्र बारामती येथे लँडिंग करत असताना विमानाचा भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांनी विमान अपघात झाल्याची पुष्टी केली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तात्काळ दाखल झाले. परिसर सील करण्यात आला असून बचावकार्य पूर्ण करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताच्या कारणांबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तांत्रिक बिघाड, मानवी चूक, हवामानाचा परिणाम की अन्य काही कारण — याचा शोध घेण्यासाठी तपास पथक काम करत आहे. मात्र या घटनेनंतर घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे.
राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांमध्येही या दुर्घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोक आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.