धाराशिव (वाशी) : वाशी पोलिसांनी पवनचक्कीच्या यंत्रसामुग्रीतील कॉपर केबल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ४३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गोपनीय माहितीवरून छापा
दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सिरेटीका कंपनीच्या पवनचक्क्यांमधून चोरलेला मोठ्या प्रमाणातील कॉपर केबल साठा आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने मोजे वाशी शिवारातील गट क्रमांक २७९-ब येथील शेतात लपवून ठेवण्यात आली आहेत.
माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस हवालदार क्र. १२३५ के. एस. बोरकर आणि पोलीस अंमलदार क्र. ११७३ शेळके यांनी घटनास्थळी जाऊन पडताळणी केली. माहिती सत्य असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तातडीने छापा टाकत मोठा मुद्देमाल जप्त केला.
जप्त केलेला मुद्देमाल
कॉपर केबल – ५३ बंडल (अंदाजे १५०० किलो)
किंमत – ₹१७,१०,०००/-
ट्रक (MH 12 CH 5290)
अंदाजे किंमत – ₹२५,००,०००/-
दुचाकी (MH 25 BD 5538)
अंदाजे किंमत – ₹१,२५,०००/-
एकूण जप्त किंमत – ₹४३,३५,०००/-
दोन वर्षांपासून सक्रिय टोळी
प्राथमिक तपासात ही टोळी गेल्या दोन वर्षांपासून वाशी आणि धाराशिव जिल्ह्यातील विविध भागात सक्रिय असल्याचे समोर आले आहे. पवनचक्की प्रकल्पांना लक्ष्य करत त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या केबलची चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या गुन्ह्यात खालील आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे :
राजेंद्र गुलाब काळे
माणिक गुलाब काळे
दया माणिक काळे (सर्व रा. कासारखानी, पारधी पिढी, वाशी)
रामा उर्फ शेंडी सुबराव काळे (रा. तेरखेडा)
बबलू मधुकर शिंदे (रा. तेरखेडा)
सचिन बापू शिंदे (रा. इटकूर, ता. कळंब)
पंचनामा व पुढील कारवाई
सदर कारवाईचा पंचनामा करून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. सिरेटीका कंपनीच्या प्रतिनिधींना घटनास्थळी बोलावून जप्त मालाची खातरजमा करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शपकत आमन, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केली. या पथकात पोहेका कपिल बोरकर, राम शेळके, विठ्ठल मलंगनेर, गोपीनाथ पवार आणि नसीर सय्यद यांचा सहभाग होता.
दरम्यान, या कारवाईमुळे पवनचक्की प्रकल्पांमधील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.