शिराढोण (ता. कळंब):
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिराढोण (ता. कळंब) येथे शिराढोण व नायगाव जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना आमदार घाडगे-पाटील म्हणाले की, “जनतेच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहणे, सर्वसामान्यांच्या अडचणींना न्याय देणे आणि लोकशाही मूल्यांवर आधारित स्वच्छ राजकारण करणे हीच आपली भूमिका आहे.” आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ राजकीय लढत नसून प्रत्येक कार्यकर्त्याच्या निष्ठा, संघटनशक्ती आणि समर्पणाची खरी कसोटी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांच्या ताकदीवर, जनतेच्या विश्वासावर आणि संघटनेच्या बळावर प्रत्येक जागेवर सक्षम, विश्वासार्ह व काम करणारे उमेदवार देऊन निवडणुका प्रामाणिकपणे जिंकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संघटन मजबूत ठेवत तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आवाहनही आमदार घाडगे-पाटील यांनी केले.
या बैठकीस शिराढोण व नायगाव जिल्हा परिषद गटातील विविध गावांतील प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नियोजन, संघटनात्मक मजबुती आणि जनसंपर्क वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.