धाराशिव,दि.९ नोव्हेंबर ) जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्याकडून जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखालील रिक्त ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानुसार, दिनांक ०३/०९/२०२५ ते १५/०९/२०२५ या कालावधीत इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
सदर प्राप्त अर्जांची यादी दिनांक ३०/०९/२०२५ रोजी जिल्हा संकेतस्थळावर https://dharashiv.maharashtra.gov.in/
वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
सध्या प्राप्त अर्जांची छाननीची कार्यवाही सुरू असून,या छाननीनंतर पात्र व अपात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.पात्र/अपात्र यादीवर आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत देण्यात येईल. या कालावधीत इच्छुक अर्जदारांना आपले सरकार पोर्टलवरून किंवा निर्धारित माध्यमातून आक्षेप नोंदविता येतील.
प्राप्त आक्षेपांवर नियमांनुसार कार्यवाही करून,त्यांचे परीक्षण झाल्यानंतर पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीची कार्यवाही शासन निर्णयानुसार,गुणवत्तेच्या आधारे आणि संपूर्ण पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे.
तसेच,वरील सर्व प्रक्रियेबाबतची अद्ययावत माहिती वेळोवेळी जिल्हा संकेतस्थळावर https://dharashiv.maharashtra.gov.in/
प्रसिद्ध केली जाणार आहे.जिल्हा प्रशासनाने अर्जदारांना कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.