धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय

Spread the love

धाराशिवच्या वैभवात भर!

शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय

सहा मजले, १६ कोर्ट आणि प्रशस्त सभागृहाचा समावेश : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिव: आपल्या धाराशिवचा कायापालट होत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिव शहराच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जिल्ह्याच्या वाढत्या विस्ताराचा आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार करून, शहरात अत्याधुनिक व नवीन सहा मजली जिल्हा व सत्र न्यायालय इमारत उभारली जाणार आहे. या भव्य प्रकल्पासाठी ८९ कोटी ७६ लाख रुपयांच्या खर्चाला उच्च स्तरीय समितीची मंजुरी मिळाली आहे. तुळजापूर येथील वातानुकूलित न्यायालय इमारती पाठोपाठ आत ही इमारतही जिल्ह्याची ठळक ओळख ठरणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली होणारी ही इमारत पूर्णपणे ‘हायटेक’ असणार आहे. जुन्या इमारतीची अवस्था पाहता, आता ‘तळमजला अधिक ६ मजले’ असे सुसज्ज न्यायभवन उभारण्यात येणार आहे. यामध्ये एकूण १६ कोर्ट हॉल असतील, ज्यात विशेष पोक्सो (POSCO) कोर्ट, लोक न्यायालय आणि हाय सिक्युरिटी कोर्टाचाही समावेश असणार आहे. पक्षकार आणि वकिलांच्या सोयीसाठी ३ आणि न्यायाधीशांसाठी स्वतंत्र ३ अशा एकूण ६ लिफ्ट या इमारतीमध्ये बसवण्यात येणार आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही इमारत ‘हरित संकल्पनेवर’ (Green Building) आधारित असेल. यात सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची विशेष तरतूद करण्यात आली आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली राहणार असून सक्षम आणि आधुनिक आग प्रतिबंधक यंत्रणाही याठिकाणी बसवली जाणार आहे. प्रशस्त अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, सुसज्ज फर्निचर आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र बोअरवेलची व्यवस्थाही इमारत आराखड्यात करण्यात आली आहे. सध्याची जुनी इमारत स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये कमकुवत झाली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच, नियमानुसार जुन्या इमारतीचे पाडकाम केले जाईल, जेणेकरून सुरक्षिततेचा कोणताही प्रश्न राहणार नसल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. धाराशिव शहरात होऊ घातलेल्या या भव्य न्यायालय इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हावासियांच्या वतीने मनापासून आभार मानले आहेत.

इमारत शहराचे एक महत्त्वाचे ‘लँडमार्क’ ठरेल,
लवकरच कामाला सुरुवात : आमदार पाटील

मुंबई उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या निकषानुसार व मानांकनानुसार ही इमारत साकारली जाणार आहे. मुंबई येथील मुख्य वास्तुशास्त्रज्ञांनी या इमारतीच्या नकाशांना आणि आराखड्यांना मंजुरीही दिली आहे. एकूण १५ हजार ८२३.६१ चौरस मीटर क्षेत्रफळात ही देखणी आणि भव्य वास्तू उभारली जाणार आहे. ही इमारत शहराचे एक महत्त्वाचे ‘लँडमार्क’ ठरेल, असा विश्वास असून न्यायालयाच्या या नवीन इमारतीमुळे वकील बांधव आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो पक्षकारांना हक्काची आणि सोयीची जागा उपलब्ध होणार आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तुळजापुर नगरीत संपूर्ण वातानुकूलित न्यायालय इमारतीचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. आता धाराशिव शहरातही एक भव्य आणि आकर्षक वास्तू लवकरच पहायला मिळणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!