धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासह मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेतील चर्चेदरम्यान आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारकडे 1000 कोटी रुपयांच्या तातडीच्या निधीची मागणी केली असून, लातूर–पुणे इंटरसिटी सुरू करणे, हरंगूळ–पुणे गाडी मुख्य स्थानकापर्यंत चालवणे, तसेच विविध रेल्वे थांबे व नवीन मार्गांच्या सर्वेक्षणाच्या मागण्या केल्या आहेत. याचवेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते ॲड. नितीन भोसले यांनी खासदारांवर टीका करत, पूर्वी राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार असताना प्रकल्पासाठी निधी न दिल्यामुळे कामात अडथळे निर्माण झाले, आणि आता काम प्रगतीपथावर असताना श्रेय लाटण्यासाठीच ही मागणी केली जात असल्याचा आरोप केला आहे.
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्यावे- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली केंद्रीय रेल्वे मंत्र्याकडे मागणी , धाराशिव–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाबाबत विशेष मागणी
नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर ठाम आणि आक्रमक भूमिका मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. मराठवाड्याच्या विकासासाठी सक्षम रेल्वे सुविधा अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित करत त्यांनी खालील महत्त्वाच्या मागण्या केल्या:
१. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपयाची तात्काळ तरतुद करावी
तुळजापूरला रेल्वेने जोडण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. धाराशिव ते तुळजापूर या मार्गाचे काम सुरू असले तरी तुळजापूर ते सोलापूर हा टप्पा अजूनही निविदा प्रक्रियेत अडकलेला आहे. या संपूर्ण मार्गासाठी सुमारे २ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून केंद्राने आपला १ हजार कोटी रुपयांचा हिस्सा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. यामुळे आई तुळजाभवानीचे पवित्र तीर्थक्षेत्र रेल्वे नकाशावर येईल.
२. लातूर-पुणे इंटरसिटी गाडी तातडीने सुरू करा
लातूर, धाराशिव आणि बार्शी परिसरातील हजारो विद्यार्थी व नोकरदार दररोज पुण्याकडे प्रवास करतात. सध्याच्या गाड्यांची अपुरी संख्या लक्षात घेता लातूर ते पुणे इंटरसिटी गाडी तातडीने सुरू करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
३. हरंगूळ-पुणे गाडी पुणे मुख्य स्थानकापर्यंत चालवा
सध्या हरंगूळ ते पुणे गाडी हडपसरपर्यंतच धावते, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. ही गाडी पूर्वीप्रमाणे पुणे मुख्य स्थानकापर्यंत चालवावी, अशी मागणी करण्यात आली.
४. रेल्वे थांबे व नवीन मार्गांचे सर्वेक्षण
* कळंब रोड स्थानकावर लातूर-मुंबई गाडीला थांबा देण्यात यावा
* ढोकी स्थानकावर नांदेड-पनवेल गाडीला थांबा द्यावा
* धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजूर निधीबद्दल समाधान व्यक्त करत हे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली
५. पुणे-सिकंदराबाद जलद गती मार्ग धाराशिव-लातूरमार्गे न्यावा
पुणे ते सिकंदराबाद या प्रस्तावित जलद गती मार्गाचा समावेश धाराशिव व लातूरमार्गे करण्यात यावा, जेणेकरून मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली
६. धाराशिव–छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाबाबत विशेष मागणी
छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे प्रमुख विभागीय व न्यायिक केंद्र असून येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ, अजिंठा-वेरूळसारखी जागतिक वारसा स्थळे तसेच Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University असल्यामुळे मराठवाड्यातील नागरिक, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील लोकांची येथे सतत ये-जा सुरू असते
धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर हा थेट रेल्वे मार्ग निर्माण करणे अत्यंत आवश्यक असून यामुळे मराठवाड्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल, असे खासदारांनी ठामपणे मांडले. या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारकडून ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करत रेल्वे मंत्रालयाचे आभार मानण्यात आले. मात्र हे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला गती द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली . या मार्गामुळे धाराशिव व परिसरातील नागरिकांना छत्रपती संभाजीनगर येथे प्रवास करणे अधिक जलद, सुरक्षित व सोयीस्कर होणार असून विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आहेत अशी प्रेस नोट द्वारे माहिती संतोष खोचरे, स्वीय सहाय्यक , खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे. तर यांचं यास प्रेसनोट उत्तर म्हणून भाजपने देखील एक्सप्रेस नोट काढली आहे. ती खालील प्रमाणे.. !
अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न
उबाठाच्या खासदारांवर भाजपाच्या ॲड भोसले यांची सडकून टीका
स्वतःचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी रेल्वेमार्गाच्या कामात असंख्य अडथळे आणले, आणि आता काम प्रगतीपथावर असताना लोकसभेत मागणीचे नाटक करून त्याचे श्रेय लाटण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा हा केविलवाणा स्टंट आहे. अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न अशा शब्दांत भाजपचे जिल्हा प्रवक्ते ॲड. नितीन भोसले यांनी खासदारांच्या दुटप्पी भूमिकेचा पंचनामा करीत सडकून टीका केली आहे. वरातीमागून घोडे दामटणाऱ्या खासदारांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, असा इशाराही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
ॲड भोसले यांनी थेट वार करताना म्हटले की, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी ५० टक्के वाटा निश्चित झाला होता. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याच्या हिश्याची रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी खासदारांनी आपल्या पक्षप्रमुखांकडे पाठपुरावा का केला नाही? असा खोचक सवाल भोसले यांनी उपस्थित केला आहे. ठाकरेंच्या या ‘आडमुठ्या’ धोरणामुळेच प्रकल्पाची किंमत तब्बल दोन हजार कोटी रुपयांनी वाढली आणि कामाला विलंब झाला, असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांनी केला आहे.
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर यावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा प्रकल्प जाहीर केला. या रेल्वेमार्गासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधानसभेत दिशाभूल करणारी माहिती दिल्यावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्यावर हक्कभंग दाखल केला होता. राज्यात महायुतीचे सरकार येताच आमदार पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून राज्याच्या वाट्याची रक्कम मंजूर करून घेतली.
आज धाराशिव-तुळजापूर या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच इंजिन ट्रायल होईल. आई तुळजाभवानी मातेच्या चरणी तुळजाभवानी एक्सप्रेस धावत येईल. ठाकरे सरकारच्या काळात राज्याचा वाटा मिळाला असता तर एव्हाना हा प्रकल्प पूर्णही झाला असता. महायुती सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच आज प्रकल्प प्रगतीपथावर आहे. स्वतःच्या सत्ताकाळात काहीच करता आले नाही. आता महायुती सरकारने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी खासदारांची ‘स्टंटबाजी’ सुरू आहे. लोकसभेत या मार्गासाठी एक हजार कोटींची मागणी करणे ही केवळ नौटंकी आहे. जेव्हा स्वतःच्या पक्षाचे सरकार असताना निधी रोखला गेला, तेव्हा खासदार मूग गिळून का.गप्प बसले होते ? आता काम पूर्णत्वाकडे जाताना श्रेयासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचा टोलाही भोसले यांनी लगावला. ज्यांनी प्रकल्पाला खीळ घातली, तेच आता श्रेयाचा टाहो फोडत आहेत. धाराशिवची जनता सुज्ञ असून खासदारांचा हा ‘वरातीमागून घोडे’ दामटण्याचा प्रकार सगळ्यांना माहीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.