जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार

Spread the love


जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी

सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार

धाराशिव : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील समुद्राला वाहून जाणारे पुराचे पाणी मराठवाड्यात वळवून आणण्याच्या आपण मांडलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे आता मोठी गती मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतून २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा दिलासा मिळणार आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या माध्यमातून पर्यटनाला उभारी देणे आणि दळणवळणाची सक्षम जाळे निर्माण करण्याचे जे ध्येय आपण ठरवले होते त्याला या अर्थसंकल्पामुळे मोठी ताकद मिळाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या विकास कार्यक्रमाला अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे आणखी मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पासाठी या अर्थसंकल्पात महत्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमुळे जिल्ह्यातील दळणवळणाचे जाळे आणखी सक्षम होणार आहे. त्यामुळे आपण पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी आता आणखी मदत होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राआत्या पवार यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा देणारा आहे. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प जिल्हयातील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणारा ठरेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.आमदार पाटील यांनी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंदजी फडणवीस साहेब व एकनाथराव शिंदे साहेब व सुनेत्राताई पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे विशेष आभारही मानले आहेत.

अर्थसंकल्पात राज्यातील पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार आहे. त्यासाठी सुमारे २०,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. साडेसात एचपीपर्यंत वीज मोफत दिली जाणार असून शेतकरी बांधवांना दिवसा वीजपुरवठा करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे धाराशिवमधील हजारो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. धाराशिव जिल्ह्याचा समावेश आता आकांक्षित जिल्हे व तालुके कार्यक्रमात करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुके आणि इतर भागांचा गतिमान विकास साधला जाणार आहे. एका हजार लोकसंख्या असलेले प्रत्येक गाव सिमेंट रस्त्यांनी जोडण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला अधिक निधी आणि सोयीसुविधा प्राप्त होतील असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

शेती, रस्ते, रेल्वे, सामाजिक न्याय सर्व आघाड्यांवर जिल्ह्याला झुकते माप : आमदार राणाजगजितसिंह पाटील

कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहेच. राज्यात आणखी २५ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य निदानासाठी आशियाई विकास बँकेच्या मदतीने ४,५०० कोटींची प्रगती योजना राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा १०० टक्के वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अनुसूचित जाती आणि आदिवासी घटकांसाठी अनुक्रमे २३,१५० कोटी आणि २१,७२३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत हा अर्थसंकल्प धाराशिव जिल्ह्याच्या शाश्वत विकासाची पायाभरणी करणारा आहे. शेती, रस्ते, रेल्वे आणि सामाजिक न्याय या सर्वच आघाड्यांवर महायुती सरकारने जिल्ह्याला झुकते माप दिले आहे. धाराशिवच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!