धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून न्यूरोसर्जन तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मेंदूविकार, अपघातातील डोक्याला झालेली गंभीर इजा तसेच मज्जासंस्थेशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना तातडीच्या उपचारांची गरज असताना, उपचाराअभावी रुग्णांचे हाल होत आहेत.
रुग्णालयात सिटीस्कॅन सेवा सुरू आहे, तसेच एमआरआय यंत्र देखील उपलब्ध आहे. मात्र, प्रशासनाकडून “अजून काही तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे” असे कारण पुढे केले जात असून, त्यामुळे एमआरआय सेवा अद्याप रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, रुग्णांना एमआरआयसाठी खासगी केंद्रांकडे किंवा इतर शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे.
दरम्यान, नागरिकांमध्ये याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. काहींच्या मते एमआरआय सेवा उद्घाटन झाले नसल्यामुळे प्रत्यक्ष वापरासाठी ती सुरू करण्यात आलेली नाही, तर काहींच्या मते ठेकेदारी, टक्केवारी किंवा श्रेयवादाच्या वादामुळे सेवा रखडली आहे. या सर्व चर्चांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
न्यूरोसर्जन नसल्याने आणि एमआरआय सेवा बंद असल्याने अनेक गंभीर रुग्णांना लातूर, सोलापूर किंवा छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात येत आहे. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळण्याचा धोका वाढत असून आर्थिक भारही नातेवाईकांवर पडत आहे.
या संपूर्ण परिस्थितीत प्रशासनातील श्रेयवाद, मंजुरींचा विलंब आणि निर्णयक्षमता अभाव याचा थेट फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य शासन व आरोग्य विभागाने तातडीने धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरोसर्जनची नियुक्ती करावी, एमआरआय सेवा सुरू करावी आणि रुग्णांना होणाऱ्या त्रासाला आळा घालावा, अशी जोरदार मागणी होत आहे.