धाराशिव प्रतिनिधी :
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीच्या टप्प्यात असलेल्या गहू, ज्वारी, हरभरा तसेच कांदा व विविध फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतात काढून वाळत टाकलेला हरभरा पाण्यात भिजला आहे. त्यामुळे दाण्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता निर्माण झाली असून बाजारभावावरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. ज्वारीच्या कणसात पाणी शिरल्याने ती काळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर गव्हाच्या उभ्या पिकालाही फटका बसला आहे. कांद्याच्या काढणीदरम्यान शेतात पाणी साचल्याने उत्पादनाचे नुकसान झाले आहे.
सध्या जिल्ह्यात रबी पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पिके जोपासली होती. मात्र अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तलाठी व कृषी विभागामार्फत पंचनामे करावेत, तसेच बाधित शेतकऱ्यांना त्वरित व योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत जाहीर करून आर्थिक आधार द्यावा, अन्यथा शेतकरी मोठ्या अडचणीत सापडेल, असेही त्यांनी नमूद केले.