धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरोसर्जन नसल्याने रुग्णांचे हाल; सिटीस्कॅन-एमआरआय करूनही उपचार मिळेना

Spread the love


धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल कॉलेज) गेल्या अनेक दिवसांपासून न्यूरोसर्जन (मेंदू व मज्जासंस्था तज्ज्ञ) डॉक्टर उपलब्ध नसल्याने गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मेंदूविकार, अपघातातील डोक्याला झालेली गंभीर इजा, मेंदूतील रक्तस्राव, मज्जासंस्थेशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना तातडीच्या उपचारांची गरज असतानाही डॉक्टरच उपलब्ध नसल्याने उपचार रखडत आहेत.


रुग्णांना सिटीस्कॅन व एमआरआय तपासण्या करून दिल्या जात आहेत. मात्र, तपासणीनंतर अहवाल पाहून पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणारा न्यूरोसर्जन नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याने आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.


विशेष म्हणजे, धाराशिवसह परिसरातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर अवलंबून आहेत. अपघातग्रस्त रुग्ण, अचानक बेशुद्धावस्थेत गेलेले रुग्ण यांना तातडीच्या उपचारांची आवश्यकता असते. मात्र, न्यूरोसर्जन नसल्याने काही रुग्णांना लातूर, सोलापूर किंवा औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे रेफर करावे लागत आहे, त्यामुळे वेळेवर उपचार न मिळण्याचा धोका वाढला आहे.


रुग्णांच्या नातेवाइकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “वैद्यकीय महाविद्यालय असूनही तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतील तर सर्वसामान्यांनी कुठे जायचे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व राज्य शासनाने तातडीने धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी न्यूरोसर्जनची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी रुग्ण, नातेवाईक व नागरिकांकडून होत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!