उमरगा (ता. धाराशिव), २२ जून – उमरगा (वा) गावात बुद्ध विहार व संस्कार केंद्र उभारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेऊन शिंदे व त्यांच्या शिष्टमंडळाने ही मागणी केली. या शिष्टमंडळात धाराशिवचे विशाल सिंगाडे, सांगलीचे सिद्धार्थ माने आणि कोल्हापूरचे प्रमोद कदम यांचा समावेश होता.
राज्यातील बौद्ध समाजातील नागरिक, लहान मुले आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी तथागत बुद्धांच्या विचारांची शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे गावोगावी बुद्ध विहार आणि धम्म संस्कार केंद्र उभारण्यावर भर देण्यात यावा, असे शिष्टमंडळाचे म्हणणे आहे.
विहार निर्मितीमुळे समाजात शिक्षण संस्कार रुजतील, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी रुची निर्माण होईल व सामाजिक सशक्तीकरणास चालना मिळेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या मागणीला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या पावल्या उचलल्या जातील, अशी माहिती कैलास शिंदे यांनी दिली.