वाशी (धाराशिव) | प्रतिनिधी
वाशी तालुक्यातील खामकरवाडी शिवारात आज सायंकाळी सहा वाजेनंतर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. डिझायर फायर वर्क्स या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्फोटाबाबत सध्या प्रशासन किंवा आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. तसेच या घटनेत नेमकी किती हानी झाली याबाबतही अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी तेरखेडा परिसरात फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटाच्या घटना घडल्या असून, त्या दुर्घटनांमध्ये गंभीर स्वरूपाची जीवितहानी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही काळ विनापरवाना फटाक्यांच्या कारखान्यांवर कारवाई करत, परवानगीपेक्षा अधिक बारूद साठवणूक व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर नोटिसा बजावल्या होत्या.
मात्र, कारखानदारांकडून नियमांचे काटेकोर पालन न झाल्यामुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असल्याचे चित्र आहे. केवळ तात्पुरती कारवाई करून पुन्हा त्याच परिसरात फटाक्यांचे कारखाने सुरू होणे, हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा मुद्दा ठरत आहे.
या घटनेबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील अपडेट प्रसिद्ध करण्यात येणार आहे.