कळंब (धाराशिव): कळंब नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या उपस्थितीत व तालुकाध्यक्ष श्रीधर भवर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली.
या वेळी बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडीत राहूनच निवडणूक लढवायची आहे, मात्र कार्यकर्त्यांनाही न्याय मिळायला हवा. जर काही ठिकाणी आपल्या पक्षाचा उमेदवार जिंकण्याची शक्यता जास्त असेल आणि ती जागा आघाडीतून मिळत नसेल, तर जिल्हास्तरावरील आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल.”
तालुकाध्यक्ष श्रीधर भवर यांनी नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळावे यासाठी प्रयत्न जिल्हा स्तरावर प्रयत्न करावे असे सांगितले. जिल्हा प्रवक्ता प्रा.तुषार वाघमारे यांनी म्हटले की, “आपली ताकद मतदानानंतर दिसते. आपण पूर्वी महाविकास आघाडीत शिवसेनेला साथ दिली, आता त्यांनीही त्याची परतफेड करावी.”
शहराध्यक्ष मुसद्दीक काझी यांनी समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. बैठकीत दहा प्रभागांमधून जवळपास २६ इच्छुकांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली असून, पक्षाकडे सर्व प्रभागात तसेच नगराध्यक्ष पदासाठीही सक्षम उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले.
बैठकीस राष्ट्रवादी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने,तालुका उपाध्यक्ष आत्माराम बिक्कड, सामाजिक न्याय आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनंदा भोसले,ॲड.मनोज चोंदे,विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस अतिश वाघमारे,अक्रूर सोनटक्के, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस(SP) तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष भीमा हगारे,शोभा मस्के,स्वाती भातलवंडे, संतोष पवार, बाबासाहेब कुंभकर्ण, संकेत नरवडे, विठ्ठल कोकाटे, श्रीकांत मिटकरी, नितीन वाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदांसाठी प्रा.मिनाक्षी भवर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्राध्यापक मीनाक्षी भवर यांनी नगराध्यक्ष पदासाठी ची निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला व यास उपस्थित सर्वांनी अनुमोदन देत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले त्यामुळे आता महाविकास आघाडी कडून लढताना ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर प्रा. मीनाक्षी भवर या उमेदवार असणार आहेत.