आचारसंहितेची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Spread the love

जि प व पं.स.सार्वत्रिक निवडणूक २०२६

आचारसंहितेची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

धाराशिव दि.१४ जानेवारी (जिमाका) जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची त्वरित बैठक घेऊन आदर्श आचारसंहितेची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करावी.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत श्री.पुजार बोलत होते.या बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे,उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती.स्वाती शेंडे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार,निवडणूक निर्णय अधिकारी सर्वश्री.प्रवीण धरमकर,संतोष राऊत, अरुणा गायकवाड,श्रीकांत पाटील,ओंकार देशमुख,दत्तू शेवाळे,गणेश शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे,वीज वितरणचे कार्यकारी अभियंता नरेंद्र रडे यांच्यासह सर्व तहसीलदार व सर्व गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री.पुजार म्हणाले की,निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी.नामांकनपत्रे दाखल करताना गोंधळ होणार नाही याची माहिती राजकीय पक्षांच्या बैठकीत द्यावी.विविध राजकीय पक्षांच्या रॅलीमध्ये सहभागी असलेल्या वाहनांची नोंद घ्यावी.सर्व राजकीय पक्षांना समानतेची वागणूक द्यावी.आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. नामनिर्देशनपत्रे या निवडणुकीत ऑफलाइन दाखल करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकविषयक माहिती देताना श्रीमती.शेंडे म्हणाल्या की,निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप २७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नंतर करण्यात येईल.मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत होईल.मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजतापासून सुरू होईल. या निवडणुकीत एकूण ११ लक्ष ४५ हजार ८८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.यामध्ये ६ लक्ष ५ हजार ८४३ पुरुष,५ लक्ष ४० हजार ३७ स्त्री व ८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती,वाहतूक व्यवस्थापन समिती,कायदा व सुव्यवस्था समिती,प्रसारमाध्यम व संदेश वहन समिती,नियंत्रण कक्ष,जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समिती व जनजागृतीसाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

या निवडणुकीसाठी १३०८  मतदान केंद्रावर मतदार होणार आहे.आठही तालुक्यात प्रत्येकी एक आदर्श मतदान केंद्र असून परदानशील मतदान केंद्राची संख्या २० आहे.प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी १ महिला व प्रत्येकी १ दिव्यांग मतदान केंद्र राहणार आहे.संवेदनशील मतदान केंद्रामध्ये भूम तालुक्यातील पाटसांगवी व लोहारा तालुक्यातील धानुरी येथील मतदान केंद्राचा समावेश आहे.अशी माहिती श्रीमती. शेंडे यांनी सादरीकरणातून यावेळी दिली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!