धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी

Spread the love


धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी


धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर महायुतीने जिल्ह्यात सत्ता स्थापन करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने संघटनबळाच्या जोरावर ही निवडणूक लढवत सर्वाधिक जागा मिळवल्या असून, भारतीय जनता पक्षाच्या अर्चना पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकत भारतीय जनता पार्टी हा जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष ठरला असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी नमूद केले आहे. नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरही पक्षाला मिळालेले यश हे जनतेने विकासाच्या राजकारणाला दिलेला कौल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपने राबवलेल्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी, जनतेशी सातत्याने ठेवलेला संपर्क आणि पक्षाच्या नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेला विश्वास यामुळेच पक्षाच्या कामाला जिल्ह्यात व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. या विश्वासाच्या बळावर जिल्ह्यातील जनतेने भाजपला मोठ्या प्रमाणात स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी संघटन बळकट करण्यासाठी घेतलेले परिश्रम, गावोगावी उभे राहिलेले कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि नियोजनबद्ध निवडणूक यंत्रणा यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत पक्षाच्या नेतृत्वाला संधी मिळणे ही संघटनशक्तीचीच पावती असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता प्रस्थापित होत विकासकामांना अधिक गती मिळणार असून, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शेतकरी, महिला व युवकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला. नगरपालिका ते जिल्हा परिषद असा मिळालेला विजय हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा व जनतेच्या विश्वासाचा परिणाम असून, या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!