धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
धाराशिव : आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात विशेष कार्यक्रम व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवार 9 मार्च रोजी करण्यात आले होते. यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी , कर्मचारी ,रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा स्त्री रुग्णालय येथे जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रम धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता शैलेंद्र चौव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ, डॉ.शिवाजी फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात केले होते.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल वाघमारे होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे, डॉ. मधुकर सूर्यवंशी, डॉ. शैलजा मिटकरी, डॉ. रेखा टिके, डॉ. रामढवे, मेट्रन गोरे मॅडम व पी. जी. सानप यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
महिला दिनानिमित्त रुग्णालयात गरजू महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले. यामध्ये रक्तदाब, रक्ताक्षय, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तसेच स्तन कर्करोग बाबत तपासणी व जनजागृती करण्यात आली. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी व योग्य आहार घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिबेका भंडारे यांनी केले तर आभार मंगेश सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमास रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.