मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज केली. या घोषणेनुसार राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा निवडणुकीत समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी 16 ते 21 जानेवारी 2026 ही मुदत देण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी 22 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी अंतिम उमेदवार यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी मतदान 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार असून, मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादाही जाहीर करण्यात आल्या असून ७१ ते ७५ निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी उमेदवारांना ९ लाख रुपये, तर त्याअंतर्गत पंचायत समितींसाठी ६ लाख रुपये खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे. ६१ ते ७० निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी ही मर्यादा ७ लाख ५० हजार रुपये व पंचायत समित्यांसाठी ५ लाख २५ हजार रुपये असून, ५० ते ६० निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी ६ लाख रुपये आणि पंचायत समित्यांसाठी ४ लाख ५० हजार रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील एकूण १२ जिल्हा परिषदांमध्ये ७३१ जागा असून त्यापैकी ३६९ जागा महिलांसाठी, ८३ अनुसूचित जातींसाठी, २५ अनुसूचित जमातींसाठी व १९१ जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव आहेत. तसेच १२५ पंचायत समित्यांमध्ये एकूण १,४६२ जागा असून त्यामध्ये ७३१ जागा महिलांसाठी, १६६ अनुसूचित जातींसाठी, ३८ अनुसूचित जमातींसाठी व ३४२ जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक सूचनेची प्रसिद्धी १६ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, नामनिर्देशनपत्रे १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत स्वीकारली जाणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ जानेवारी २०२६ रोजी होईल, उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत व निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी २७ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मतदान ५ फेब्रुवारी २०२६ रोजी तर मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.