धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत तेर गटातून आम आदमी पार्टीकडून रत्नमाला पिंपळे यांनी उमेदवारी दाखल केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक रिंगणात उतरताच त्यांनी प्रचाराला वेग दिला असून, गावोगावी मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रस्थापित विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.
रत्नमाला पिंपळे यांच्या सामाजिक कार्याची पार्श्वभूमी भक्कम आहे. त्यांचे पती तानाजी पिंपळे हे गेल्या पाच ते सात वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. लहान मुलांसाठी शैक्षणिक संकुल उभारणीचा पुढाकार, तेर येथील घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश, तसेच सुमारे दोन हजार झाडांचे संवर्धन करून पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श त्यांनी उभा केला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही रत्नमाला पिंपळे ठाम आणि आक्रमक भूमिका घेताना दिसून आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी आंदोलन करत त्यांनी रस्त्यावर उतरून लढा दिला. यासोबतच गरीब व होतकरू मुलींसाठी सायकल वाटप, महिलांसाठी मार्गदर्शन उपक्रम, तसेच बचत गटातील महिलांना विविध शासकीय योजनांचा वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
विशेष म्हणजे तानाजी पिंपळे हे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक असून, आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे आरक्षण, शेतकरी हित, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाची ओळख रत्नमाला पिंपळेंना मिळत आहे.
‘राजकारण हे सेवा करण्याचे माध्यम आहे’ या आम आदमी पार्टीच्या भूमिकेला अनुसरून, तेर गटात स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराचे स्वप्न त्यांनी मतदारांसमोर मांडले आहे. त्यामुळे येत्या काळात तेर गटातील निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची चिन्हे असून, ‘आप’च्या या उमेदवारामुळे विरोधकांची डोकेदुखी वाढणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.