धाराशिव: तालुक्यातील आळणी येथे मकरसंक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व तिळगुळ वाटप समारंभ उत्साहात पार पडला. सूर्याच्या उपासनेचा, तिळाच्या तेजाचा आणि गुळाच्या गोडव्याचा संदेश देणाऱ्या या सणानिमित्त आयोजित कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने महिला भगिनी या वेळी उपस्थित होत्या. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन धाराशिव जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना हळदी-कुंकू करून तिळगुळ व वाण वाटप करण्यात आले तसेच मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या निमित्ताने महिलांशी विविध सामाजिक विषयांवर संवाद साधण्यात आला. महिलांना रोजगारनिर्मितीच्या संधी, स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून देत सक्षम बनण्याचा संदेश देण्यात आला.
आमदार राणादादा पाटील यांच्या माध्यमातून आळणी गावातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून उर्वरित विकासकामांसाठीही आवश्यक निधीची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन अर्चना पाटील यांनी दिले. तसेच आळणी व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत गावकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीला एकजुटीने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे महिलांमध्ये एकोपा, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ होत असून गावाच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास महानंदा चौगुले, रुपाली वीर, संजीवनी पौळ, अनिता वीर, अनिता पौळ, वर्षा पौळ यांच्यासह प्रदीप वीर, प्रमोद वीर, हरिदास चौगुले, आबासाहेब साळुंके, हरिदास म्हेत्रे, लहू तोडकर, भाऊसाहेब वीर, रमाकांत लावंड, समाधान देशमुख, बाबासाहेब घाटे, नारायण कोरे, नेताजी कोरे, मधुकर कोरे, शंकर गाडे, वैभव साळुंके, राजेंद्र वीर, धनंजय वीर, श्रीकांत चौगुले तसेच गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.