धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तांडव; कळंब तालुक्यात शेतकरी बेपत्ता, शेतीचे मोठे नुकसान! पालकमंत्री?

Spread the love

धाराशिव, दि. १५ ऑगस्ट – धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव, कळंब, वाशी, भूम आणि परंडा तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.

कळंब तालुक्यातील खोंदला गावात पावसाच्या पाण्यात एक शेतकरी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच अनेक नागरिक पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. या घटनेची माहिती मिळताच आमदार कैलास पाटील आणि तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. आमदार कैलास पाटील हे बेपत्ता शेतकऱ्याचा शोध घेण्यासाठी स्वतः घटनास्थळी थांबले आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासनाची बचाव पथके शोध मोहिम राबवत आहेत.

याचदरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री दोन दिवसीय धाराशिव दौऱ्यावर असून पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याऐवजी स्थानिक प्रशासनाशी फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून आढावा घेतल्याचे समजते. त्यामुळे घटनास्थळी प्रत्यक्ष हजेरी लावून जनतेच्या समस्या ऐकण्याऐवजी पाठी फिरवल्याची चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे.

सुब्राव शंकर लांडगे (वय 60 वर्षे), रा. खोंदला, ता. कळंब, हे शेतातून घरी येत असताना अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेले. या घटनेनंतर त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. परिसरातील नागरिकही या मोहिमेत सहभागी झाले असून, लांडगे यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!