निकृष्ट कामावर चौकशीचे आश्वासन म्हणजे चुकीच्या नियोजनावर पांघरूण?

Spread the love



धाराशिव, १२ जून | अंतरसंवाद न्यूज | सलीम पठाण

धाराशिव व तुळजापूर येथील एस.टी. बसस्थानकाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी, ही चौकशी म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी तर नाही ना, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.



१ मे रोजी उद्घाटन झालेले दोन्ही बसस्थानकांचे काम अद्याप अपूर्ण होते, याचा उल्लेख मंत्री स्वतः करत आहेत. मग उद्घाटनापूर्वी कामांची खातरजमा न करता घाईघाईने कार्यक्रम पार पाडण्यात नेमकी जबाबदारी कुणाची? मंत्री म्हणून स्वतःची जबाबदारी झटकून सर्व दोष अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर टाकणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.



सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी बांधल्या जाणाऱ्या सुविधा निकृष्ट दर्जाच्या असतील, तर यामागे केवळ ठेकेदार दोषी नसून त्यांची देखरेख करणारे अधिकारी व उद्घाटन करणारे मंत्री यांचीही भूमिका तपासली पाहिजे. नागरिकांचा रोष याच मुद्द्याभोवती फिरतोय – की पालकमंत्री हे केवळ औपचारिक हजेरी लावणारे मंत्री बनले आहेत. ध्वजारोहण, उद्घाटन व विशेष कार्यक्रमांपुरते त्यांचे जिल्ह्यातील अस्तित्व मर्यादित राहत असून, प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे उदाहरण क्वचितच आढळते.



बसस्थानकासंबंधी आधीही अंतरसंवाद न्यूजने सातत्याने वस्तुनिष्ठ बातम्या प्रकाशित करून समस्यांकडे लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाने वेळेवर दखल न घेतल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. आता कारवाईची भाषा वापरण्यात येत असली तरी ती केवळ जनतेचा रोष कमी करण्यासाठीची घोषणा ठरू नये, अशी अपेक्षा आहे.

शासनाच्या निधीतून उभ्या राहणाऱ्या सुविधा अपूर्ण, निष्क्रिय आणि निकृष्ट राहिल्या तर त्यासाठी जबाबदार कोण? आणि सर्वसामान्यांना कधी मिळणार सुस्थित, सुसज्ज सेवा? असा सवाल सध्या जिल्ह्यातील नागरिक विचारत आहेत.


परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी काही गावांमध्ये एसटी सेवा सुरू करून नागरिकांच्या मागणीनुसार तात्काळ निर्णय घेतले होते, ज्याचे अंतरसंवाद न्यूजसह अनेकांनी कौतुक केले होते. मात्र धाराशिव व तुळजापूर येथील बसस्थानकाबाबत अंतरसंवाद न्यूजने उद्घाटनाआधीच अपूर्ण व निकृष्ट कामाची माहिती दिली असतानाही, संबंधित यंत्रणांनी ते दुर्लक्षित केले आणि उद्घाटन घाईघाईत पार पाडले. आता तक्रारी वाढल्यावर चौकशीचे आदेश देणे म्हणजे आधी मिळालेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून जबाबदारी झटकण्याचा प्रकार असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.



#धाराशिवन्यूज #तुळजापूरन्यूज #बसस्थानक #प्रतापसरनाईक #अंतरसंवादन्यूज #उस्मानाबादन्यूज #धाराशिव


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!