धाराशिव शहरातील रस्ते, पथदिवे, गटार यासह नागरी समस्यांवर आ. कैलास घाडगे पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

Spread the love



धाराशिव : धाराशिव शहरातील रस्ते, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, भुयारी गटार योजनेच्या कामांसह इतर नागरी समस्यांबाबत आमदार कैलास घाडगे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.


शहरातील सध्याची रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालक व नागरिकांचे हाल सुरू आहेत. खड्ड्यांमधून रस्ता शोधत प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावर उपाययोजना म्हणून मंजूर असलेल्या ५९ रस्त्यांसाठीच्या ₹१४१ कोटी निधीच्या निविदा त्वरित मंजूर करून कामे सुरू करावीत, अशी स्पष्ट सूचना आमदार घाडगे पाटील यांनी दिली.

शहरातील पथदिवे बंद असून, अनेक भागांमध्ये अंधार पसरलेला आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बंद पथदिवे त्वरित सुरु करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

जयंती मार्गाचा सर्वेक्षण करून अडथळा ठरत असलेले विद्युत पोल स्थलांतरित करावेत, तसेच तारा काढून त्या ठिकाणी भूमिगत केबल टाकण्याची सूचना करण्यात आली. शहराच्या वाढीव विस्तार भागात नवीन विद्युत लाईन टाकण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर सडकेवरील खड्डे तातडीने बुजवावेत, असेही निर्देश दिले गेले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, फवारणी व इतर उपाययोजना राबवून साथीच्या रोगांचा प्रसार टाळण्यावर भर देण्यात आला.

मुरूम टाकण्याचे काम त्वरित सुरू करून त्यासाठी वाढीव यंत्रणा नेमण्याचे आदेश देण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दबावात न राहता प्रामाणिकपणे काम करावे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करावे आणि हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशा स्पष्ट सूचना आमदार कैलास घाडगे पाटील यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीस जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, तहसीलदार मृणाल जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये सोमनाथ गुरव, खलील सर, राजाभाऊ पवार, गणेश खोचरे, पल्लू काकडे, सौदागर जगताप, अमोल मुळे, बिलाल तांबोळी, नाना घाडगे, समाधान बाराते, अजहर पठाण, शहाजी पवार आदींचा समावेश होता.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!