मर्जीतल्या गुत्तेदारासाठी भाजपा आग्रही, उबाठा खासदार आमदाराच्या भुयारी गटारामुळेच धाराशिव शहराचा सत्यनाश – सुरज साळुंखे

Spread the love

धाराशिव नगर परिषदेअंतर्गत 59 रस्त्यांसाठी 140 कोटी रूपयांचा निधी आणला; मर्जीतल्या गुत्तेदारासाठी भाजपा आग्रही, उबाठा खासदार आमदाराच्या भुयारी गटारामुळेच धाराशिव शहराचा सत्यनाश


शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके व संघटक सुधीर पाटील यांची पत्रकार परिषदेत टिका


धाराशिव –
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख भाई एकनाथजी शिंदे यांच्याकडे तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे धाराशिव नगर परिषदेला पहिल्यांदाच भरघोस 140 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीमधून शहरातील 59 रस्ते व इतर कामांना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार्‍या मंडळींनी मंत्री महोदयांचे आभार मानायला पाहिजे होते. परंतु रस्त्याचे काम मर्जीतल्या लाडक्या गुत्तेदाराला 15 टक्के जादा दराने देण्याचा घाट भारतीय जनता पार्टीचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी केला आहे.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी 140 कोटी रुपयांच्या ठेकेदारीवरून सुरू असलेल्या रस्ता कामांचा समाचार घेतला. यावेळी शिवसेनेचे संघटक सुधीर पाटील, शहरप्रमुख आकाश कोकाटे, डी. एन. कोळी उपस्थित होते.

रस्ताकामासाठी मंजूर झालेल्या 140 कोटी रूपयांच्या निधीबाबत मध्यंतरी स्थगिती देण्याचे कारण यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी स्पष्ट केले. हा निधी कोणी मंजूर केला आणि कोणी मंजूर करवून आणला याबाबत  ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर थयथयाट करणार्‍यानी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख भाई एकनाथजी शिंदे, तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि निधीचा दुरूपयोग करणार्यावर नियमाचा बडगा उगारणारे विद्यमान पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांचे आभार मानायचे सोडून ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर थयथयाट सुरू केला असल्याचा घणाघात त्यांनी केला. त्याचबरोबर या कामाच्या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेवून याबाबत निवेदन देवून चर्चा करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनीही या कामात लक्ष घातले असून त्यांचेही समर्थन आपणास मिळाले असल्याचेही साळुंके यांनी सांगितले.

140 कोटी रूपयांच्या कामात मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि लाडका गुत्तेदार यांची मुंबई येथे  बैठक कुठे झाली? आणि त्यांच्यामध्ये  रोख दोन ( 2 ) कोटी रूपयांची ‘डील’ झाली याचीही माहिती आपल्याकडे आहे. त्यामुळे कोणीही भ्रमात राहू नये असेही यावेळी साळुंके यांनी स्पष्ट केले.

धाराशिव शहरातील नागरिकांची रस्त्यांची गैरसोय लक्षात घेवून विविध भागातील 59 रस्त्यांच्या कामांसाठी 140 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात यावा तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री भाई एकनाथजी शिंदे आणि पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे सतत  पाठपुरावा केला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री भाई एकनाथजी शिंदे यांनी तब्बल 140 कोटी रूपयांचा निधी धाराशिव नगर परिषदेकरिता मंजूर केला. तेव्हा जनतेचे तारणहार म्हणून मिरवणार्या तुळजापूरच्या भाजप आमदाराने धाराशिव शहरातील चौकाचौकात मोठमोठे बॅनर लावून निधीचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा घणाघात सुरज साळुंके यांनी केला.


धाराशिव शहरातील अंतर्गत रस्त्यांची काही कामे यापूर्वीच झालेली आहेत. तरी देखील त्याच रस्त्याच्या कामाचे टेंडर पुन्हा काढण्याचे कारण काय? असा सवाल करीत निधीचा दुरूपयोग करण्याचे पाप नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि भाजपा, उबाठा गटाचे लोक करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेमुळे शहराचा सत्यानाश केला, आगामी निवडणूक समोर ठेवून सुरू असलेला हा खेळ जनता ओळखून आहे. त्यामुळे असे राजकारण चालणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


लवकरात लवकर फेरनिविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार

धाराशिव शहरात सध्या चालू असलेल्या राजकारणावर पडदा पाडून शहराचा विकास करण्यासाठी नेहमीच शिवसेना कटिबद्ध असते त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आम्ही फेरनिविदा काढून लवकरच शहरवासीयांना होणार्‍या त्रासापासून मुक्त करू, असेही सुरज साळुंके यांनी सांगितले. परिषदेत टिका


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!