धाराशिव शहरातील रस्त्यांच्या विकासकामाला तात्पुरती स्थगिती; ठाकरे गटाच्या नेत्यांनी ही पोस्ट आनंदाने शेअर केली – भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांची प्रतिक्रिया

Spread the love



धाराशिव (प्रतिनिधी): धाराशिव शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या तब्बल ₹१४० ( ११७) कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याने शहरात राजकीय चर्चा चांगलीच रंगली आहे. या प्रकल्पाचा मंजुरी आदेश महायुती सरकारच्या काळात निघाला होता. यासाठी तुळजापूरचे माजी आमदार राणाजगजितसिंह पाटील (राणादादा) यांनी तुळजापूर, नळदुर्ग, धाराशिव आणि कळंब शहरांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला होता.

तीन दिवसांपूर्वी या कामांचा कार्यारंभ आदेश निर्गमित झाला आणि रस्त्यांवरील खड्यांनी त्रस्त झालेल्या धाराशिवकरांना विकासाचा एक नवा आशेचा किरण दिसला. शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, दुसऱ्याच दिवशी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कामावर आक्षेप घेतला आणि SIT चौकशीची मागणी केली. यानंतर काही दिवसांतच या कामाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याची बातमी समोर आली.

या घडामोडींनंतर शहरात पुन्हा एकदा राजकीय चढाओढ तीव्र झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी ही स्थगिती “विकास रोखणारा निर्णय” असल्याची टीका केली, तर दुसऱ्या बाजूने काहीजणांनी या स्थगितीचे स्वागत केल्याचेही सोशल मीडियावर दिसून आले.

भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल हरिभाऊ काकडे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत नागरिकांना आवाहन केले आहे की —

> “आपल्या शहराच्या विकासाच्या बाबतीत मागील काही घडामोडींचा बारकाईने अभ्यास करावा. राणादादा यांनी आणलेला निधी हा शहराच्या प्रगतीसाठी आहे. काहीजणांना हा विकास पचनी पडत नाही, म्हणूनच अशा प्रकारे अडथळे निर्माण केले जात आहेत. आम्हाला विश्वास आहे की राणादादा सर्व अडचणींवर मात करून हे काम लवकरच सुरू करतील.”



शेवटी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले —

> “राणादादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.”


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!