आई तुळजाभवानी मंत्री राणे यांना सद्बुद्धी देवो – शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा टोला , डीपीसी निधी स्थगितीवरून भाजपावर टीकास्त्र

Spread the love

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची प्रतिक्रिया

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्याचे बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी डीपीसी (जिल्हा वार्षिक योजना) निधीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी मंत्री राणे यांना “आई तुळजाभवानी सद्बुद्धी देवो” अशी जहाल प्रतिक्रिया देत भाजपा नेतृत्वावर टीकास्त्र सोडले आहे.

मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘बाप’ असे संबोधून पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा अवमान केल्याचा आरोप साळुंके यांनी केला. “वास्तविक परिस्थितीची पूर्ण माहिती नसताना दिलेलं वक्तव्य हे जनतेचा आणि जिल्ह्याच्या विकासाचा अवमान आहे,” असेही साळुंके यांनी सांगितले.

शिवसेनेने केलेल्या आरोपानुसार, डीपीसीचा निधी जनतेच्या विकासासाठी असूनही भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी देऊन निधी स्थगित करण्यास भाग पाडले. त्यानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी हा निधी पुन्हा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला.

सुरज साळुंके म्हणाले, “डीपीसीचा निधी मार्च 2024 पूर्वी खर्च होणे आवश्यक होते, मात्र भाजप नेत्यांच्या छुप्या कारवाया आणि विरोधामुळे जिल्ह्यातील विकासकामे ठप्प झाली आहेत. मंत्री राणे यांचे विधान हे केवळ दिशाभूल करणारे नाही तर जनतेच्या हक्कावर गदा आणणारे आहे. त्यामुळे आम्ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की, त्यांनी अशा मंत्र्यांना सद्बुद्धी देवो.”

या वक्तव्यानंतर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!