धाराशिव शहरात राजकीय तापमान वाढले – “हीच तुझी लायकी” बॅनरबाजीने रंगले शहराचे राजकारण

Spread the love



धाराशिव (प्रतिनिधी) –
धाराशिव शहरातील राजकारण पुन्हा एकदा गजबजले असून, शहरात “हीच तुझी लायकी” या वाक्याने सुरू झालेल्या बॅनरबाजीने वातावरण चांगलेच तापले आहे. रस्त्यांच्या खड्ड्यांनी त्रस्त नागरिक, थांबलेली विकासकामे आणि त्यावरून सुरू झालेली राजकीय कुरघोडी — या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही युवकांनी बॅनर लावून थेट राजकीय व्यक्तींवर टीका केली आहे. बॅनरवरील मजकूरात म्हटले आहे —



> “पक्षप्रवेश करतो असे सांगून पालकमंत्र्याकडे भीक मागून धाराशिवचा विकास निधी थांबवण्याचा प्रयत्न करणारा… हीच तुझी लायकी!”
“रडू नको बाळा!”


या बॅनरमुळे शहरातील नागरिक व सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, धाराशिव शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती व विकासकामांसाठी गेल्या १८ महिन्यांपासून मंजूर असलेला निधी अजून वापरात आलेला नाही. काही महिन्यांपूर्वी शहरातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांकडून रस्ते दुरुस्तीची मागणी सातत्याने होत असतानाच निधी स्थगित झाल्याने संताप वाढला आहे.



राजकीय वर्तुळात सध्या आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. काही नेते हे निधी थांबवण्यात राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करत आहेत. तर काहींच्या मते शहराच्या विकास निधीचा वापर राजकीय दबावाखाली अडवला जात आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मदत मिळण्यात विलंब झाल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. त्यातच शहरातील रस्ते, ड्रेनेज आणि अन्य विकास कामे ठप्प झाल्याने प्रशासन व राजकीय नेतृत्वाविषयी असंतोष वाढला आहे.

धाराशिव शहरात सध्या “हीच तुझी लायकी” या बॅनरबाजीमुळे राजकीय चर्चांना जोर आला आहे. येत्या काही दिवसांत या बॅनरबाजीचा मुद्दा आणखी रंग घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!