सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून हाडपलेली रक्कम शासन खाती भरण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

Spread the love


वाशी (प्रतिनिधी): वाशी तालुक्यातील  सर्वात मोठी,सतत चर्चेत असणारी व सतत वादग्रस्त असणारी ग्रामपंचायत चा भ्रष्टाचार अखेर उघड झाला आहे.राजकीय वरदहस्तामुळे सतत कारवाई साठी वाचत आलेले सरपंच राजेंद्र पांडुरंग काशीद, आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण देशमुख यांना अखेर शासन खाती रक्कम जमा करण्याचे आदेश  जितेंद्र पापळकर (भाप्रसे)विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर विभाग यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशामुळे वाशी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तालुक्यातील ज्या सरपंच व ग्रामसेवकांनी अपहार केलेला आहे. त्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.


                   याबाबत अधिक माहिती अशी की,वाशी तालुक्यातील पारा येथील वादी बाजीराव उद्धव भराटे यांनी तक्रार दिली होती त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांनी चौकशी केली असता वसंतराव नाईक तांडा सुधार रक्कम रुपये 233000/- ,अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजना रक्कम रुपये 60000/- व ग्रामनिधी खात्यावरील रक्कम रुपये 43000/- याप्रमाणे एकूण रक्कम
336000/- रुपये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांचे नावे उचलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहितांमधील वित्तीय नियमांचे उल्लंघन करून अनियमितता केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. ग्रामपंचायत ने विकास कामे करताना तसेच साहित्य खरेदी करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहितेनुसार व शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठी च्या कार्यपद्धतीबाबत शासन परिपत्रक दि. 22/9/2022 नुसार दिलेल्या सूचनेनुसार खरेदी केलेल्या वस्तूंची गुणवत्ता तपासणी करणे.देयका मधून शासकीय कपात करणे याप्रमाणे कार्यवाही केल्याचे सादर अभिलेखांवरून दिसून येत नाही. यास सरपंच व ग्राम विकास अधिकारी प्रथमदर्शनी जबाबदार असल्याचे दिसून येते. त्यामुळे सरपंच राजेंद्र पांडुरंग काशीद यांचे विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) अन्वये कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी कार्यालयास प्राप्त झाले.
             त्यानंतर दि.6/1/ 24, दि.11/12/ 24 ला सुनावणी झाली. दि. 13 /5/25 रोजी सुनावणी झाली त्यावेळी प्रशासनाच्या वतीने पंचायत समिती वाशीचे सहाय्यक गट विकास अधिकारी बी. एस. राठोड, विस्तार अधिकारी( पं) व्ही.बी.रूपवट, पी.बी.देशमुख तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी व कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी ए. बी. शेख या सुनावणीस उपस्थित राहिले. यानंतर पुढील तारीख 24/6 /25 नंतर दि.15 /7/ 25 , दि.29 /7 /25 ,दि. 12 /8/25  रोजी निकालासाठी राखीव ठेवून सदर प्रकरणातील निर्णय दि. 30 /9 /25 रोजी
(1) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांचा अहवाल जा. क्र. जि. प. धा/सा. प्र. वि./2/ग्रा. प. वि.8/सीआर-ई -855774/कावि/56/2024 दि.28 /1/2025 मान्य करण्यात येतो.
(2) गैरअर्जदार राजेंद्र पांडुरंग काशीद सरपंच ग्रामपंचायत पारा ता. वाशी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 ( 1) मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात येत आहे.


(3) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांनी उक्त चौकशी अहवालाच्या अनुषंगाने अपहारित रक्कम निश्चित करण्यासाठी विशेष समिती गठित करून सदर रक्कम शासनखाती भरण्याची कार्यवाही करावी. तसेच अपहारित रकमेची वसुली न झाल्यास नियमानुसार संबंधितांच्या मालमत्ता जसे 7/12 वर अपहारित रकमेचा बोजा टाकण्याची कार्यवाही करावी. असे आदेश जितेंद्र पापळकर भाप्रसे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर विभाग यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करून सरपंच राजेंद्र काशिद यांच्या कडील अपहारित रक्कम कशी आणि किती दिवसात वसूल करतात आणि ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या वर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव काय कार्यवाही करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!