धाराशिव जिल्ह्यात महसूल विभागातील बदल्यांमध्ये गंभीर अनियमितता; ओव्हरस्टे कर्मचाऱ्यांना सुट – अमोल जाधव यांची चौकशीची मागणी

Spread the love

प्रतिनिधी :
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील महसूल विभागामध्ये नुकत्याच पार पडलेल्या बदल्या प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप शिवसैनिक अमोल जाधव यांनी केला आहे. त्यांनी महसूल मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे ही बाब उपस्थित करत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.

अमोल जाधव यांनी सांगितले की, मे २०२५ मध्ये झालेल्या बदल्या प्रक्रियेमध्ये काही कर्मचारी हे लिपीक वर्गीय पदावरून पदोन्नती मिळवूनही गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून एकाच मुख्यालयात महसूल सहाय्यक अथवा सहाय्यक महसूल अधिकारी या पदांवर कार्यरत आहेत. शासन नियमानुसार कोणताही कर्मचारी जास्तीत जास्त ६ वर्षेच एखाद्या मुख्यालयात कार्यरत राहू शकतो. मात्र, याठिकाणी नियमानाच सर्रास उल्लंघन झाल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, या बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली आहे, त्यांचा ‘ओव्हरस्टे’ गृहित न धरता त्यांना बदल्यांमधून वगळण्यात आले आहे. जरी पदोन्नती झाली असली तरी, कर्मचारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्षे कार्यरत असल्यास त्यांचा ओव्हरस्टे धरून त्यांची इतरत्र बदली होणे आवश्यक आहे. परंतु याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांच्या निकटवर्तीय कर्मचाऱ्यांना बदल्यांमधून सुट दिली गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

अमोल जाधव यांनी महसूल मंत्री यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात मागणी केली आहे की, महसूल विभागातील या संपूर्ण बदल्या प्रक्रियेची सखोल चौकशी करून ज्या कर्मचाऱ्यांनी १० वर्षांहून अधिक काळ एकाच मुख्यालयात ठाण मांडलेला आहे, त्यांची तात्काळ इतरत्र बदली करण्यात यावी. तसेच, चुकीची माहिती देणाऱ्या आणि बदल्या प्रक्रियेत अनियमितता घडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

या प्रकरणामुळे महसूल विभागातील बदल्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक कर्मचारी आणि जनतेमध्येही संतापाची लाट उसळली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर महसूल मंत्रालय कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!