धाराशिव जिल्ह्यात प्लाझमा,बीम लाईट व लेझर लाईट वापरास बंदी

Spread the love

धाराशिव,दि.२६ ऑगस्ट (प्रतिनिधी ) आगामी श्रीगणेशोत्सव,विसर्जन मिरवणुका तसेच ईद-ए-मिलाद या पारंपरिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये धाराशिव जिल्ह्यात २६ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्लाझमा,बीम लाईट व लेझर बीम लाईटच्या वापरावर बंदी लागू करण्यात आली आहे.

पोलीस अधिक्षक यांच्या सूचनेनुसार, श्रीगणेश उत्सव दिनांक २७ ऑगस्टपासून सुरू होत असून ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी विसर्जन होणार आहे.तसेच ७,८ व ९ सप्टेंबर रोजी अकरा,बारा व तेरा दिवसांचे गणपती विसर्जन पार पडणार आहेत. याशिवाय ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादचा सण साजरा होणार आहे.या काळात मिरवणुका,जुलूस व शोभायात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लाझमा व लेझर लाईटचा वापर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,या प्रखर प्रकाशामुळे लहान मुले,ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी निर्बंध लागू करताना सांगितले की,“जिल्ह्यातील सर्व सण-उत्सव, विसर्जन मिरवणुका व जुलूस शांततेत,सुरक्षिततेत व कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी प्लाझमा, बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर टाळणे अत्यावश्यक आहे.”

त्यामुळे,२६ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२५ दरम्यान कोणत्याही मिरवणुका,शोभायात्रा किंवा धार्मिक कार्यक्रमात अशा प्रकारच्या लाईटचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

या आदेशामुळे सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे होऊन नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण व कायदा- सुव्यवस्था अबाधित राहील,असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!