पूरग्रस्त लांबोटी गावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट : तातडीच्या मदतीची ग्वाही

Spread the love





सोलापूर, दि. २४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावाला भेट देऊन अतिवृष्टी व धरणातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता, शासनाकडून तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.



गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे लांबोटी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतजमिनी, घरे, मंदिरांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची पिकेही नष्ट झाली आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या सव्वाचार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.



सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी येथील पुलावरून पाणी पातळी वाढल्यामुळे जड वाहतुकीस सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली असून अत्यावश्यक सेवा एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.



या पाहणी दौऱ्यात निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, मोहोळचे आमदार राजू खरे, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!