शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Spread the love

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे मदतही अभूतपूर्वच असायला हवी अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे केली होती. त्यानुसार सगळे निकष बाजूला सारून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात येईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवंद्रजी फडणवीस यांनी बुधवारी उजनी (ता. औसा, जि. लातूर) येथे केली आहे. अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बुधवारी दुपारी औसा येथील हेलिपॅडवर आगमन झाले. तेथून त्यांनी मोटारीने उजनी गाठली.  सोबत मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील होते. १२ सप्टेंबर रोजी रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे उजनीला पाण्याचा वेढा पडला होता. दुसऱ्याच दिवशी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उजनीला भेट देऊन पाहणी केली होती. त्यांनंतर आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना मराठवाड्यावर ओढवलेल्या आपत्तीबाबत माहिती दिली होती.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील काही भागांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर ते औसा परिसरातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. उजनीत पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रासह मराठवाडा, लातूर, धाराशिव जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आणि ते पाणी शेतांमध्ये शिरल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे धान्यासह संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळेच आपण स्वतः पाहणी करण्यासाठी येथे आलो असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी नमूद केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, की ही परिस्थिती पाहूनच शासन म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो, की सर्व निकष बाजूला सारून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या या जाहीर  घोषणेचे उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. टंचाईच्या परिस्थिती ज्या उपाययोजना केल्या जातात, तशाच उपाययोजना आता करण्यात येतील. ज्यांच्या घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे, त्यांनाही मदत केली जाणार असल्याचे सांगत त्यासाठी मदतीचा २३०० कोटींचा पहिला हप्ता कालच जारी करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे. आता या नुकसानीची पाहणी झाल्यानंतर तातडीने ही मदत केली जाईल. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा आवर्जून नमूद केल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.

यावेळी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!