धाराशिव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून राजकारण पेटले!

Spread the love


आमदार-खासदार आमने-सामने; वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चढाओढ, प्रभाग बदलामुळे माजी नगरसेवकांसमोर मोठे आव्हान

धाराशिव ( सलीम पठाण )
धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या निवडणुका जरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या असल्या तरी त्यात थेट आमदार, खासदार आणि विरोधी गटातील नेत्यांनीही सहभाग नोंदवला आहे. प्रत्येक नेत्यासाठी ही निवडणूक “आपले वर्चस्व सिद्ध करण्याची परीक्षा” ठरणार आहे.




🔸 धाराशिव जिल्ह्याचे राजकीय चित्र

धाराशिव जिल्ह्यात सध्या राजकीय पातळीवर अत्यंत रंगतदार समीकरण आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि धाराशिव  , उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे तीघेही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) आहेत.

तर तुळजापूर मतदारसंघाचे आमदार भाजपचे आहेत.

भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार शिवसेना (एकनाथ शिंदे गटाचे) आहेत.


या सर्वांचे वेगवेगळ्या गटांमधील असलेले नाते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिक ठळकपणे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडीतील गटबाजी उफाळून येत आहे.




🔸 महायुतीत आणि महाविकास आघाडीत दोन्हीकडे मतभेद

महायुतीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप हे स्वतंत्र लढतीच्या तयारीत दिसत आहेत, तर महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यातही स्वतंत्र उमेदवारीचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मात्र या निवडणुकांपासून अलिप्त राहील, असे स्पष्ट चित्र आहे.

जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे एकही लोकप्रतिनिधी उरले नसल्याने पक्षाची उपस्थिती जवळपास संपुष्टात आली आहे, असे मानले जात आहे.



🔸 प्रभाग रचना बदलामुळे माजी नगरसेवकांसमोर मोठी कसरत

धाराशिव जिल्ह्यातील अनेक नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये दोन ते तीन वर्षांपासून प्रशासकांचा कारभार सुरू असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. आता निवडणुका जाहीर झाल्यामुळे माजी नगरसेवकांसमोर मोठी कसरत उभी राहिली आहे.

प्रभाग रचना पूर्णपणे बदलल्याने अनेक माजी नगरसेवकांना नवीन प्रभागात लोकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. नागरिकांच्या नाराजीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




🔸 “आता तरी संधी मिळावी” – कार्यकर्त्यांचा सूर

महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पातळ्यांवर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसत आहे. अनेक कार्यकर्त्यांचा सूर स्पष्ट आहे –
“दरवेळी आम्ही दुसऱ्याचा झेंडा घेऊनच फिरायचं का? या निवडणुकीत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आता तरी संधी मिळायला हवी.”
या भावना जिल्हाभर उमटत असून त्यामुळे निवडणुकीत नवीन चेहरे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रभाग रचना बदलली; मतदारही संभ्रमात

जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये प्रभाग रचना पूर्णपणे बदलल्यामुळे मतदारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नागरिक एका प्रभागात राहतात, परंतु त्यांचे नाव दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीत आले आहे. या गोंधळामुळे मतदारांची उपस्थिती आणि मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडीने धाराशिव नगरपालिकेसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला असून, निवडणूक विभागाने यावर योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
तर भाजपने देखील याच संदर्भात आपले म्हणणे अधिकृतरित्या निवडणूक विभागाकडे सादर केल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजप आणि महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषद

भाजपची पत्रकार परिषद महाविकास आघाडीवर टीका.., निवडणूक विभागावर आक्षेप?

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद.. , निवडणूक विभागावर आक्षेप?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!