पत्रकारांनी आपल्या लेखणीतून व्यसनमुक्तीची जनजागृती तळागाळापर्यंत पोहोचवावी – न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील

Spread the love

 

 

व्यसनमुक्त सप्ताहचा समारोप

 

धाराशिव दि.१० ऑक्टोबर (जिमाका) आजच्या काळात समाजामध्ये व्यसनाधीनतेच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.ती जबाबदारी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. भाग्यश्री पाटील यांनी केले.

आज धाराशिव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद,जिल्हा परिषद धाराशिव व यश फाउंडेशन येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व्यसनमुक्ती सप्ताह २०२५ ची सांगता कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सच्चिदानंद बांगर,के.टी.पाटील नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.गजानन वाले,यश फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संदीप तांबारे, येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ.पल्लवी तांबारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

न्या.श्रीमती पाटील म्हणाल्या की, आजची सामाजिक परिस्थिती बघितली तर फार थोडे अधिकारी व सामाजिक संस्था व्यसनमुक्त समाज करण्यासाठी अग्रेसर आहेत.स्पर्धेच्या युगामध्ये ताण-तणावाचे दिवस असून जगावे कशी अशा वेळी कोणीतरी एखादा सामाजिक दृष्टिकोन असलेला अधिकारी व समाजसेवक देवदूत बनवून व्यसनमुक्तीसाठी धावून येत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच व्यसनामुळे फक्त एका व्यक्तीचे नुकसान होत नाही तर ते संपूर्ण कुटुंबच अधोगतीला जाते.त्याबरोबरच संपूर्ण समाजाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी काम करणे आवश्यक असून भविष्यामध्ये वाताहात झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

महत्त्वाचे म्हणजे २५ सप्टेंबर २०२५ रोजी न्यायालयाने अमली पदार्थविरोधी पथक गटात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.या पथकामध्ये जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधीक्षक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देश दिलेले आहेत.त्यामुळे या माध्यमातून नशामुक्तीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुढाकार घेणार आहे. मात्र,त्यासाठी पत्रकारांनी नशामुक्ती संदर्भात वेगवेगळ्या व्यसनमुक्त कार्यक्रमाच्या बातम्या,विशेष लेख आदींच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचून नशा मुक्तीसाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचे न्या पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

 

व्यसनाधीनतेची समस्या आज कोण्या एका घरात नसून ती प्रत्येकांच्या घरामध्ये निर्माण झालेली असल्याने अनेक कुटुंब या कचाट्यात अडकलेले आहेत.त्यामुळे अनेक संसार उध्वस्त झाले असून होत आहेत.त्यामुळे ते संकट दूर करण्यासाठी प्रत्येकानेच आपली समस्या आहे असे समजून पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे कवले यांनी सांगितले.तसेच व्यसनमुक्ती सप्ताहाची आज समाप्ती होत असली तरी वर्षभर असे कार्यक्रम आयोजित करणे काळाची गरज असल्याचे कवले यांनी सांगितले. 

डॉ.संदीप तांबारे यांनी यश फाउंडेशनच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत वर्षभर व्यसनमुक्ती शिबिर,महिला मेळावे,यौवन कार्यशाळा,चर्चासत्र,निबंध स्पर्धा व प्रबोधनात्मक पथनाट्य आदींसह विविध कार्यक्रमाची माहिती सांगितली.

यावेळी के.टी.पाटील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वृद्धापकाळातील विसरभोळेपणा यावर प्रकाश टाकणारी नाटिका,येरमाळा येथील विद्या निकेतन प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती पथनाट्य सादर केले.तसेच आंदोरा येथील राजे शिवछत्रपती मंडळाने लेझीमद्वारे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम सादर केला.येडाई व्यसनमुक्त केंद्राच्या माध्यमातून जिम वर्कआउटच्या माध्यमातून व्यसनावर कशी मात करता येते का याचे सादरीकरण केले.तर जामगाव (आ) येथील आयुष व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने मानवी मनोरे तयार करून व्यसनापासून अलिप्त राहण्याचा संदेश दिला.तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरा, कौडगांव,वडगांव, इर्ला आणि शिंगोली येथील आदर्श प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती संदर्भात निबंध स्पर्धेत माध्यमातून विशेष उल्लेखनीय कार्य केले.

यावेळी व्यसनमुक्तीसाठी निस्वार्थपणे योगदान देणाऱ्या अंगद चव्हाण, अतुल गायकवाड,श्रुतिका हाजगुडे, पांडुरंग तांबारे,तुषार वाघमारे,प्रदीप शेळवणे,नानासाहेब धाकतोडे,प्रदीप लोंढे,पांडुरंग मते,दीपक राऊत, रणजीत मोरे यांना व्यसनमुक्ती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर व्यसनमुक्तीबाबत आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती परिषदेत शोध प्रबंध सादर करणाऱ्या कविता अंधारे,७५ कुटुंबाचे नव्याने संसार फुलविणाऱ्या मृणाली मोरे कारागृहात व्यसनमुक्ती जनजागृती करणाऱ्या द्वारका देवळे समुपदेशनाद्वारे व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्या स्वप्नील जाधव, व्यसनमुक्तीनंतर आर्थिक संपत्ती व नियंत्रण आणि योग्य वापर यावर काम करीत २६ कुटुंबांचे नव्याने संसार फुलविणाऱ्या सिंधू शिनगारे, व्यसनापासून परावर्त करणाऱ्या अश्विनी कुंभार,व्यसन पीडित कुटुंबाच्या घरात नव्याने आनंद निर्माण करणारे शरद तुपरे, गणपतीसिंग परदेशी,बापूराव हुलुळे, प्रियांका शिंदे,कविता तांबारे,स्वाती भातलवंडे,मानसिक आरोग्य परिचार्या तृप्ती माने ऋत्विका गिरी कल्पना कोठावळे यांना व्यसनमुक्ती सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रारंभी महामानवांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक सचिन कवले यांनी केले. सूत्रसंचालन कल्पना कोठावळे यांनी व उपस्थितांचे आभार डॉ.संदीप तांबारे यांनी मानले.यावेळी महिला, पुरुष,विद्यार्थी,व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!