लिंकींग करणाऱ्या खत कंपन्या व विक्रेत्यांवर होणार कडक कारवाई – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे निर्देश

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने खते मिळावीत यासाठी आज दिनांक २३ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी मा. किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली खत उत्पादक कंपन्या व खत विक्रेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

जिल्हाधिकारी पुजार यांनी स्पष्ट निर्देश दिले की, कोणत्याही परिस्थितीत खते खरेदी करताना शेतकऱ्यांवर लिंकींगचा (एका खतासोबत दुसरे खत घेण्याची सक्ती) दबाव आणू नये. तसेच कोणत्याही शेतकऱ्याला MRP पेक्षा जास्त दराने खते विकल्यास संबंधित कंपनी किंवा विक्रेत्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ व खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.

महत्त्वाचे निर्देश:

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते वेळेवर व सहज उपलब्ध करावीत.

खते विकताना एम.आर.पी.च्या बाहेर दर लावू नये.

वितरण प्रक्रिया पारदर्शक असावी.

कृषि सेवा केंद्रावर दर व उपलब्धतेची माहिती स्पष्टपणे लावावी.

कृत्रिम टंचाई निर्माण करू नये.

शेतकऱ्यांना सूचना: शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करावीत. खरेदी करताना पक्की पावती घ्यावी आणि खताच्या पिशवीवरील दर बिलाशी जुळतो का याची खात्री करावी. अनुदानित खत खरेदी करताना ई-पॉस मशीनवरील बिल घ्यावे. बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग, वेस्टन, पिशवी व थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करणे आवश्यक आहे.

तक्रार निवारण व्यवस्था: शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हा तक्रार कक्षाचा संपर्क क्रमांक: ०२४७२-२२२३७९४. याशिवाय तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती कृषि अधिकारी किंवा क्षेत्रीय कर्मचारी यांच्याकडे देखील तक्रार नोंदवता येईल, असे आवाहन जिल्हा कृषि अधीक्षक श्री. रविंद्र माने यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषिक अ‍ॅपचा वापर:
खत विक्रेत्यांकडील अद्ययावत साठा पाहण्यासाठी ‘कृषिक अ‍ॅप’चा वापर करावा. तसेच शिफारसीनुसार खतांची निवड करून कोणत्याही कंपनीच्या नावाचा अट्टाहास न करता योग्य खत वापरणे फायदेशीर ठरेल.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!