धाराशिव –
महाराष्ट्र सरकारकडून हिंदी भाषा सक्तीने लादण्याच्या हालचालींचा निषेध म्हणून धाराशिव शहरात रविवारी (दि. २९ जून) तीव्र आंदोलन करण्यात आले. ‘तमाम महाराष्ट्रप्रेमी मराठी जनता धाराशिव’ या मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या हिंदी सक्तीविरोधी आदेशाची होळी करण्यात आली.
“मराठी आमुची मायबोली”, “मराठी जगवू, मराठी वाढवू, मराठी बोलू”, अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी स्पष्टपणे इशारा दिला की, मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही आणि कोणतीही परकी भाषा सक्तीने लादली जाणार असेल, तर तीव्र जनआंदोलन उभे राहील.
या आंदोलनात शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते, साहित्यिक, शिक्षक, पत्रकार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य मराठीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये नितीन तावडे, राजेंद्र अत्रे, भारत इंगळे, बालाजी तांबे, लक्ष्मीकांत जाधव, रवींद्र केसकर, दौलत निपाणीकर, माधव इंगळे, सुनील बडूरकर, महेश पोतदार, संतोष हंबीरे, जमीर शेख, अग्निवेश शिंदे, शेखर घोडके, राणा बनसोडे, अभिराज कदम, राज निकम, प्रा. तुषार वाघमारे आदींसह ७० हून अधिक मराठी माणसांनी सहभाग घेतला.
शासन जर मराठी भाषेच्या अस्मितेला तडा देण्याचा प्रयत्न करणार असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा जनआंदोलनांची लाट उसळेल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.