धाराशिव : ही लढाई विकास पाहिजे की विनाश पाहिजे ही ठरवण्याची आहे. सत्य विरुद्ध असत्य आणि संस्कृतीच्या विरुद्ध विकृती अशी लढाई आहे. या लोकसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका जर कोणाची असेल तर ती तुमची आणि माझी म्हणजेच 50% मातृशक्तीची आहे.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या मतदानाच्या हक्काची पूर्तता करा. मतदान करायला आवर्जून जा. विकासासाठी अर्चना पाटलांना निवडून द्या असे आवाहन भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मतदारांना केले.
धाराशिवच्या लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित महिला मेळाव्यात भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ बोलत होत्या.
चित्रा वाघ म्हणाल्या, नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी शौचालयापासून संसदेतील आरक्षणापर्यंत अनेक गोष्टी दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाक मधून देखील मुक्तता दिली आहे. कॉँग्रेसच्या काळात केवळ मुस्लिम मतदारांची मत जातील म्हणून त्यांनी ट्रिपल तलाक रद्द करण्याबाबत निर्णय घेतला गेला नाही. मात्र नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम भागिनींची सुद्धा ट्रिपल तलाकच्या जाचातून सुटका केली. त्यामुळे भाजप सरकार मुस्लिम विरोधी किंवा महिला विरोधी आहे, हा प्रचार खोटा असल्याचे दिसून येते.
पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मराठवाड्यात आले होते. तेव्हा त्यांनी नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस आणि मोडकळीस आलेल्या काँग्रेस या पक्षांचा उल्लेख केला त्यानंतर या पक्षांच्या नेत्यांचे डोकी फिरली आहेत. काहीही विधान करत देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदुत्वाला बाजूला ठेवून नकली शिवसेना काँग्रेस बरोबर गेली आणि आता महाराष्ट्रद्वेषी सुद्धा झाली. अशा शब्दात चित्रा वाघ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार आहेतच पण त्याही याधी या देशाच्या एक महिला आहेत. मात्र त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने त्यांनी नवनीत राणा यांच्यावर वैयक्तिक टीका केली. हे नाव घेतात शिवाजी महाराजांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं आणि महिलांवर टीका करतात ही नकली शिवसेना आहे.
विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही. त्यासाठी अजित पवार यांनी वेगळे होत विकासाची पाऊल वाट नाही तर एक्सप्रेस हायवे धरला आहे. म्हणून आपल्यालाही विकासाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे ही चित्रा वाघ यांनी आवर्जून सांगितले.