धाराशिव दि.02 ) बाळाला आईचे पहिले घटट पिवळे दुध देणे आवश्यक आहे.बाळाच्या वाढीसाठी प्रसुतीनंतर ताबडतोब स्तनपान केल्याने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.तसेच आईसाठी रक्तस्त्राव कमी करण्याचेही काम करते.स्तनपानामुळे आईचा कर्करोगाचा धोका कमी होतो.असे प्रतिपादन जिल्हा बालसंगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी केले. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 1 ऑगस्ट रोजी आयोजित स्तनपान सप्ताह उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
सप्ताहाचे उद्घाटन शासकीय वैदयकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार यांनी केले.यावेळी बालरोग तज्ञ डॉ.अभय शहापूरकर,जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी,डॉ.गरड,डॉ.देशपांडे, डॉ.स्वामी,डॉ.मुळे,डॉ.राजगुरू,डॉ. जिंतूरकर,डॉ.राहुल वाघमारे,डॉ. रामढवे स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.स्मिता सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.मिटकरी म्हणाले की, बाळाला आवश्यकत्यानुसार किंवा किमान दर दोन-तीन तासांनी स्तनपान करावे. रात्रीच्या वेळी देखील स्तनपान द्यावे . बाळ मध्येच झोपी जात असेल तर त्याला जागे करावे.चांगली स्थिती असते तेव्हा बाळ आईचे स्तन तोंडात धरताना मोठे तोंड उघडते.स्तनाग्र आणि भोवतालचा काळा भाग बाळाच्या तोंडात असावा.खालचा ओठ बाहेरच्या दिशेला असतो. हनुवटी स्तनास चिकटून असते.नाक मोकळे असते लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे प्रत्येक वेळी दोन्ही स्तनातून दूध पाजा एक स्तन रिकामे होईपर्यंत दूध पाजा नंतर स्तन बदला दुसऱ्या स्तनातून पाजण्यापूर्वी बाळाची ढेकर काढा. जर स्तनाचा काळा भाग दिसत असेल तर याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने धरलेले आहे.बाळ फक्त स्तनाग्र चोखेल त्याला पुरेसे दूध मिळणार नाही.आईच्या स्तनाग्रांना दुखापत होऊ शकते.स्तनपान संबंधित इतर कोणतेही माहितीसाठी तुमच्या आशा,ए.एन.एम नर्स किंवा डॉक्टरांशी संपर्क करावा,असेही त्यांनी सांगितले.
या वर्षी स्तनपानाला समर्थन देऊया …निसर्गाची पहिली लस आईचे पहिले दूध कोलोस्ट्रम जन्मानंतर पहिल्या तासात बाळाला स्तनपान द्या.हे घोषवाक्य घेवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
डॉ.स्मिता सरोदे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.स्तनपानाचे महत्त्व त्याचे टप्पे व स्त्री रुग्णालयात स्तनपानबाबत मातेस दिले जाणारे प्रशिक्षण याविषयी माहिती दिली. स्तनपानाचे महत्त्व सांगितले. डॉ.अभय शहापूरकर यांनी बाळाची काळजी,आईचे दूध किती महत्त्वाचे आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ.शिल्पा दोमकुंडवार यांनीही स्तनपान सप्ताहाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.आपण करत असलेल्या कामाचे कौतुक केले. स्तनपानाविषयी फक्त महिलांना जागृत करून चालणार नसून पुरुषांमध्येसुद्धा याबाबत जागृती करणे गरजेचे आहे,असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.सौ.देशपांडे व डॉ.सौ. जिंतूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या सप्ताहानिमित्त ए एन एम यांनी एक स्तनपानाविषयी नाटिका सादर केली.तसेच स्त्री रुग्णालयातील असिस्टंट मेट्रन,इन्चार्ज सिस्टर व सिस्टर यांनी स्तनपानाविषयी गीत सादर केले.या कार्यक्रमाचे संचालन संतोष पोतदार यांनी केले.आभार डॉ.रामढवे यांनी मानले.या कार्यक्रमास स्त्री रुग्णालयामधील सर्व अधिकारी व कर्मचारी,रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.