सोलापूर – तुळजापूर – धाराशिव रेल्वे मार्ग , १ सप्टेंबर पासून काम करण्याच्या सुचना – आ.राणाजगजितसिंह पाटील

Spread the love

Dharashiv : सोलापूर – तुळजापूर – धाराशिव रेल्वे मार्गाच्या एकुण ११० किमी लांबी पैकी धाराशिव ते तुळजापूर या ४१.४ किमी लांबीच्या रेल्वे लाईनच्या कामाची रु. ४८७ कोटींची निविदा अंतिम झाली असून कंत्राटदाराला नियुक्ती आदेश देऊन ०१ सप्टेंबर पासून काम करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित कंत्राटदार व रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आ.राणजगजितसिंह पाटील यांच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी या कामाचा आढावा घेण्यासाठी रेल्वे विभागाचे अधिकारी व संबंधित कंत्राटदाराची बैठक बोलाविली होती. सोलापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या कामाचा कालावधी ५ वर्षावरून अडीच वर्षे करण्यासाठी या कामाचे तीन भाग करण्यात आले असून पहिल्या भागाची निविदा अंतिम झाली असून दुसऱ्या भागाच्या निविदेची छाननी प्रक्रिया सुरू आहे. सदरील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याच्या सुचना देखील या बैठकीमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

रेल्वेमार्गाचे काम विहीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करून त्याचा बार चार्ट सादर करण्याच्या सूचना कंत्राटदाराला  दिल्या आहेत. सुरुवातीचे तीन महिने दर पंधरा दिवसाला या कामाचा आढावा घेण्यात येणार असून तद् नंतर दरमहा कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. वन विभाग व एमआयडीसीच्या जागेबाबतच्या अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांनी संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून आवश्यक ते निर्देश दिले आहेत. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी रेल्वे मार्गाच्या जागेची पाहणी केली असून जवळपास ९५ टक्के जमीनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे.

या रेल्वे मार्गामुळे धाराशिव येथे जंक्शन होणार असून आई तुळजाभवानीचे तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडले जाणार आहे. त्यामुळे या भागातील पर्यटनाला नवी दिशा मिळणार असून रोजगार निर्मिती व अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे.

सदरील बैठकीस प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी श्री.शिरीष यादव, उपविभागीय अधिकारी श्री.संजय ढवळे, तहसिलदार श्रीमती मृनाल जाधव, रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता श्री.बनसोडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री.मस्के, अभियंता श्री.नुर, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!