तलाठी व खाजगी लिपीक रंगेहाथ लाच घेताना अटक; धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी सापळा कारवाई

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – तहसिल कार्यालयातील कामासाठी तलाठी व त्याच्या खाजगी लिपिकाने मिळून ५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव युनिटने सोमवारी (दि. ५ मे) सापळा रचत तलाठी व त्याच्या सहकाऱ्यास ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या गट नं. १५/१० मधील शेतजमिनीतून कुळाचे नाव कमी करण्यासाठी त्यांनी तहसिल कार्यालय, धाराशिव येथे अर्ज दाखल केला होता. यावर तहसिलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तलाठी भूषण वशिष्ठ चोबे (वय ३१) व त्यांचा खाजगी लिपीक भारत शंकर मगर (वय ६४) यांनी मिळून अर्जदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारीनंतर धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज (दि. ५ मे) वाघोली येथील तलाठी कार्यालयात ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान, तलाठी भूषण चोबे यांनी भारत मगर यांच्या मार्फत तक्रारदाराकडून ४ हजार रुपये स्वीकारले व त्याचवेळी त्यांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.

आरोपींच्या अंगझडतीत तलाठीकडून ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३० ग्रॅमचा चांदीचा कडा, सॅमसंग मोबाईल, पार्कर पेन, डेल कंपनीचा शासकीय लॅपटॉप तर खाजगी लिपिकाकडून लाच रक्कम ४ हजार रुपये, अतिरिक्त १०९० रुपये रोख व एक कीपॅड मोबाईल सापडला आहे. आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून, दोघांच्या मोबाईलचा तपास केला जाणार आहे.

या प्रकरणी भूषण चोबे यांच्याविरुद्ध भ्र.प्र.क. अधिनियम कलम १२ व भारत मगर यांच्याविरुद्ध कलम ७ (अ) अंतर्गत धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस उप अधीक्षक श्री. सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले असून, त्यांना पोलीस अंमलदार नेताजी अनपट, आशीष पाटील व नागेश शेरकर यांचे सहकार्य लाभले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली अशी माहिती ACB कडून देण्यात आली आहे.

भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064 किंवा पोलीस अधीक्षक – 9923023361, पोलीस उप अधीक्षक – 9594658686 यांच्याशी संपर्क साधावा.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!