धाराशिव शहरात स्वच्छतेचा बोजवारा – पाच दिवसांपासून कचऱ्याचे ढीग, अधिकारी रजेवर; ठेकेदाराचं काम थांबले, पण बिलं जमा

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात गेल्या पाच दिवसांपासून रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी, माशा आणि डासांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. आरोग्य विभागाच्या महिला प्रमुख अधिकारी सध्या “आरोग्य कारण” सांगून रजेवर आहेत, त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी नव्याने निवडण्यात आलेल्या ठेकेदाराने अनेक भागांत नाल्यांची स्वच्छता केलीच नाही, तरीही लाखो रुपयांची बिले नगरपालिकेत जमा करण्यात आली आहेत. काम न करता ही बिले कशी मंजूर झाली? आणि ठेकेदाराची थकबाकी एवढी वाढलीच कशी? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

अनेक प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, ठेकेदाराने मागील काही महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे स्वच्छतेचे काम बंद केल्याची माहिती समोर आली आहे. जर ठेकेदार कामच करत नसेल, तर नगरपालिका प्रशासनाने त्याच्याशी केलेला करार का सुरू ठेवला? आणि नंतरही त्याचे बिले मंजूर का झाली? यावर उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक ठरत आहे.

शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा, हॉस्पिटल परिसर, शाळांच्या आजूबाजूचे रस्ते याठिकाणी कचरा साचल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढत चालला आहे.

नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत पालिका प्रशासन व ठेकेदाराच्या संदिग्ध व्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक संस्थांकडून देण्यात आला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!