निकृष्ट दर्जाचे काम : धाराशिवच्या खाजानगरमधील नालीचा स्लॅब कोसळला , नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, सुदैवाने जीवितहानी टळली

Spread the love



धाराशिव – शहरातील खाजानगर भागात धाराशिव मर्दिनी कमान ते उमर चौक दरम्यान करण्यात आलेल्या नवीन नालीच्या कामामध्ये गंभीर अनियमितता आढळून आली आहे. या नालीचे काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने रोडवर नाली वळविण्यात आली असून, काही ठिकाणी स्थानिकांचे अतिक्रमण न काढता थेट नालींचे मार्ग वळवले गेले आहेत. त्यामुळे नागरी समस्यांमध्ये भर पडली आहे.

दरम्यान, मदिना चौक परिसरात आज 3 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता सुमारास नालीवरील स्लॅब कोसळला. त्या वेळी त्या नालीच्या स्लॅब वरुन एक मालवाहतूक गाडी जात होती. अचानक स्लॅब तुटल्याने ती गाडी अडकली आणि अपघातासारखी स्थिती निर्माण झाली. सुदैवाने मोठी हानी टळली असली, तरी या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काम करताना कोणतीही योग्य देखरेख किंवा गुणवत्तेचे परीक्षण करण्यात आलेले नाही. फक्त काम लवकर पूर्ण करण्याच्या घाईत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले आहे.

शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारच्या कामांची पुनरावृत्ती झाली असून, नगरपालिका बांधकाम विभागाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रशासनाने तातडीने या कामांची चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!