सणात, दुष्काळ,विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना विजकपात का ?? आमदार कैलास पाटील यांची ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
धाराशिव ता 10: राज्यात कुठेही भारनियमन नसल्याचा दावा शासनाकडून केला जात आहे,धाराशिव जिल्ह्यात मात्र ‘अंडर फ्रिक्वेन्सी’ आणि ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’च्या गोंडस नावाखाली वारंवार विजकपात सुरू असल्याचा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला आहे. दुष्काळी परिस्थितीत आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांना विजकपातीचा अतिरिक्त फटका बसत असून ही विजकपात तात्काळ बंद करून जिल्ह्यात अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आ. पाटील म्हणाले की,छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी १९ सप्टेंबर रोजी नांदेड येथील बैठकीत ऊर्जा राज्यमंत्र्यांसमोर महावितरणचे मुंबई येथील संचालक धनंजय औंढेकर यांनी महाराष्ट्रात कुठेही लोडशेडींग नाही असे म्हटले होते. बैठकी नंतर काही दिवस विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहिला. परंतु, पुन्हा ‘अंडर फ्रिक्वेन्सी’ व ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ च्या नावाखाली विजकपात चालूच आहे.
धाराशिव जिल्ह्यात सध्या दुष्काळ जाहीर केला असून भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. विहिरी आणि विंधन विहिरींच्या पाण्याची पातळी घटल्याने नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. उपलब्ध पाण्याचा उपसा करण्यासाठी वीजपुरवठा अत्यावश्यक असताना वारंवार होणाऱ्या विजकपातीमुळे पाणी उपसा करण्यात अडचणी येत.आहेत. परिणामी पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांमध्ये आणखी भर पडत असल्याचे पत्रात म्हंटले आहे.
ऑक्टोबर महिन्यात तीव्र उष्णतेमुळे नागरिक हैराण आहेत. त्यात रात्री गावठाण वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा जवळ आल्या असून रात्रीच्या विजकपातीमुळे अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच आमदार पाटील यांनी सांगितले.
दुसरीकडे ग्रामीण भागात चोरीच्या घटनां वाढत आहेत. शेतकऱ्यांचे विद्युत पंप, विद्युत तारा आणि शेतीसाठी लागणारे साहित्य चोरीला जात असल्याने आधीच दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे.
ऐन हिंदु सणामध्येच उदा, बैलपोळा, गणपती उत्सव, गौराई आणि आता नवरात्रोत्सव सुरु होण्याअगोदर पासूनच ‘अंडर फ्रिक्वेन्सी’ व ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ च्या नावाखाली वीज कपात करण्यात येत असल्यामुळे सरकारला हेच का तुमचे हिंदुत्व वादी सरकार असा टोलाही आमदार कैलास पाटील यांनी लगावला.
राज्यात भारनियमन नसल्याचे शासनाकडून सांगण्यात येते, तर दुसरीकडे आपत्कालीन भारनियमन आणि अंडर फ्रिक्वेन्सीच्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शासनाच्या दाव्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः दुष्काळ, पाणीटंचाई, वाढती उष्णता, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता अशा प्रकारची विजकपात तातडीने थांबविणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
धाराशिव जिल्ह्यात अंडर फ्रिक्वेन्सी आणि इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली करण्यात येणारी वारंवार विजकपात तात्काळ बंद करावी. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.