शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या लढ्याला यश; खरीप २०२० च्या पीकविम्याचे २२७ कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा – आमदार कैलास पाटील

Spread the love


धाराशिव : खरीप २०२० च्या पीकविमा भरपाईसाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश आले असून, तब्बल २२७ कोटी रुपयांची पीकविमा रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील १५ दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली.

२०२० मध्ये अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, ७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती दिली नसल्याचे कारण पुढे करत विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवण्याची भूमिका घेतली होती. तसेच एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत मिळालेल्या शेतकऱ्यांनाच पीकविमा देण्याची भूमिका कंपनीने घेतल्याने हजारो शेतकऱ्यांच्या भरपाईचा प्रश्न निर्माण झाला होता.

विमा कंपनीच्या या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन उभारण्यात आले. सात दिवसांचे बेमुदत उपोषण, रस्त्यावरील आंदोलने, तसेच विमा कंपनीच्या मालमत्ता आणि बँक खात्यांवर कारवाई करून महसुली वसुली (RRC) प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. याशिवाय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयीन लढा देण्यात आला. विधिमंडळातही हा प्रश्न सातत्याने उपस्थित करण्यात आला.

या आंदोलनामुळे विमा कंपनीला आपली भूमिका बदलण्यास भाग पडले. सुरुवातीला केवळ १ लाख ६९ हजार ८६ शेतकऱ्यांनाच भरपाईसाठी पात्र ठरविण्याची भूमिका कंपनीने घेतली होती. मात्र, संघर्षानंतर पात्र शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ५३ हजारांहून अधिक झाली. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्याचा मार्ग खुला झाला.

या यशाचे संपूर्ण श्रेय धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीला आणि त्यांच्या संघर्षाला आहे. हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून न्याय्य हक्कासाठी एकत्र आलेल्या शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांनी दाखवलेली जिद्द आणि आंदोलनातील सहभागामुळेच हा लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, २२७ कोटी रुपयांच्या वितरणाचा मार्ग मोकळा झाला असला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार आहे. विमा कंपनी कितीही मोठी असली तरी शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे तिला झुकावे लागते, हे धाराशिवच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद न्यूजशी बोलताना दिली.

#पीकविमा #खरीप2020 #शेतकरी #शेतकरीसंघर्ष #कैलासपाटील #धाराशिव #उस्मानाबाद #उस्मानाबादन्यूज #धाराशिवन्यूज #CropInsurance #Farmers #KailasPatil #DharashivNews #OsmanabadNews #OsmanabadNews


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!