जलसाठ्यांमधील बाष्पीभवन नोवांतरणासाठी ‘ESM’ तंत्रज्ञानाचा प्रयोग करावा ,पाणी बचतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी

Spread the love


जलसाठ्यांमधील बाष्पीभवन नोवांतरणासाठी ‘ESM’ तंत्रज्ञानाचा प्रयोग करावा ,पाणी बचतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी

धाराशिव, दि. ५ : धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत यंदा पाणी उपलब्धतेचा मुद्दा चिंतेचा झाला आहे. उपलब्ध जलसाठ्यांमधील पाण्याचे बाष्पीभवन (Evaporation) कमी करून पाण्याची बचत करणे हे खरे तर मोठे आव्हान आहे. जलाशय, सिंचन तलाव, पाझर तलाव आणि अन्य योग्य जलसाठ्यांवर Evaporation-Suppressing Monolayer (ESM) अर्थात बाष्पीभवन-प्रतिबंधक रासायनिक एकस्तरीय आवरण तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याच्या महसूल तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केली आहे.

सध्या जिल्ह्यातील जलाशयांमध्ये उपलब्ध जिवंत पाणीसाठा अत्यल्प आहे. तो सुमारे आठ टक्क्यांच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे आवश्यक आहे. हवामानातील बदलांमुळे आगामी काळात El Niño परिस्थितीची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे तापमानात सुमारे चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तापमान वाढल्याने जलाशयांमधील बाष्पीभवनाचा वेग सामान्य परिस्थितीच्या तुलनेत सुमारे २५ टक्क्यांनी वाढू शकतो, असेही आमदार पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जलाशयातील बाष्पीभवन कमी करण्यासाठी आधुनिक व शास्त्रोक्त तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. ESM तंत्रज्ञानामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर सूक्ष्म आवरण तयार होऊन पाण्याच्या वातावरणात होणारे उत्सर्जन कमी करण्यास आणि परिणामी बाष्पीभवनाचा वेग घटविण्यास मदत होते.

तसेच वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा जलजीवसृष्टी, पाण्याची गुणवत्ता, मानवी आरोग्य आणि शेतीसाठी होणाऱ्या पाण्याच्या वापरावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची तज्ज्ञ संस्थेमार्फत तपासणी करण्याचेही सुचविण्यात आले आहे. प्रकल्पातून प्रत्यक्ष किती पाणी वाचते, त्यासाठी प्रति हेक्टर जलपृष्ठभागामागे किती खर्च येतो आणि त्याची आर्थिक व्यवहार्यता काय आहे, याचे Cost-Benefit Analysis करण्यावरही भर देण्यात आला आहे. प्रयोगाचे निष्कर्ष सकारात्मक आल्यास धाराशिवसह मराठवाड्यातील अत्यल्प जलसाठा असलेल्या निवडक जलाशयांमध्ये या तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्याबाबत आवश्यक धोरण निश्चित करावे, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. यासाठी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन धाराशिव जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ESM तंत्रज्ञान राबविण्याबाबत तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.



‘पायलट प्रोजेक्ट’ राबविण्याची मागणी

या तंत्रज्ञानाची परिणामकारकता, तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता, जलाशयाचे क्षेत्रफळ, पाण्याची गुणवत्ता आणि स्थानिक हवामान परिस्थिती यांसारख्या घटकांवर अवलंबून असू शकते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी अंमलबजावणी करण्याऐवजी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI) तसेच संबंधित तज्ज्ञ संस्थांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील निवडक जलाशयांवर प्रायोगिक प्रकल्प (Pilot Project) राबविणे अधिक योग्य ठरेल, असे आमदार पाटील यांनी सुचविले आहे. या प्रयोगांतर्गत जलाशयावर ESM तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर करून प्रयोगापूर्वी व प्रयोगानंतर पाण्याच्या पातळीतील घट, प्रत्यक्ष बाष्पीभवनाचे प्रमाण, तापमान, वाऱ्याचा वेग व आर्द्रता आदींची शास्त्रीय पद्धतीने नोंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!