धाराशिव : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, मूग, ऊस, फळबागा, फुलशेती, भाजीपाला तसेच इतर पिकांचे क्षेत्र १०० टक्के बाधित क्षेत्र म्हणून नोंद करून तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यासंदर्भात आ. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. चालू खरीप हंगामात पावसामध्ये पडलेल्या प्रदीर्घ खंडामुळे आणि निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील उभी पिके करपली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांमध्ये प्रत्यक्ष नुकसान मोठ्या प्रमाणावर असतानाही काही ठिकाणी संपूर्ण बाधित क्षेत्राची नोंद १०० टक्के बाधित म्हणून होत नसल्याची तक्रार आ.पाटील यांनी केली आहे. त्यामुळे नुकसानभरपाई आणि इतर शासकीय मदतीचा अपेक्षित लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसह मूग, ऊस, फळबागा, भाजीपाला आणि फुलशेतीचेही मोठे नुकसान झाल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पिकांची उत्पादकता जवळपास नष्ट झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असल्याचे आ.पाटील यांनी नमूद केले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील बाधित क्षेत्राची पीकनिहाय वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पाहणी करून प्रत्यक्ष पूर्ण नुकसान झालेल्या क्षेत्राची १०० टक्के बाधित क्षेत्र म्हणून नोंद करावी, तसेच त्याबाबतचा सविस्तर अहवाल तातडीने शासनाकडे सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महसूल, कृषी आणि इतर यंत्रणांना तातडीने आदेश देऊन पंचनाम्यांची कार्यवाही सुरू करावी, असेही आमदार कैलास पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.