शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रतापसिंह पाटलांच्या नावाची चर्चा; पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत येणार चुरस

Spread the love



धाराशिव (प्रतिनिधी): औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. येथून सलग तीन वेळा प्रतिनिधित्व करत असलेल्या सतीश चव्हाण यांना ही निवडणूक सोपी वाटत असतानाच, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत तितकेच तुल्यबळ ‘नेटवर्क’ असलेल्या चेहऱ्याच्या नावावर चर्चा सुरू केली आहे. पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या हालचाली राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून सुरू झाल्या आहेत.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मंगळवारी जाहीर झाली. यापूर्वी सलग तीन वेळा या मतदारसंघातून सतीश चव्हाण हे निवडून आले आहेत; मात्र यावेळी परिस्थिती बदलली असून राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहिलेला नाही. सतीश चव्हाण यांच्याकडे शिक्षण संस्थांचे मोठे जाळे आणि स्वतःचे मजबूत नेटवर्क असले, तरी त्यांच्याविरोधात विरोधी पक्षांचा चेहरा कोण असणार, यावर या निवडणुकीची गणिते ठरणार आहेत.

या पार्श्वभूमीवर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने थेट धाराशिवचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. प्रतापसिंह पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम असून त्यांच्याकडेही शिक्षण संस्थांचे मोठे जाळे आहे. त्यासोबतच परभणी आणि बीड जिल्ह्यात त्यांचे नातेसंबंधांचे जाळे आहे, जे सतीश चव्हाण यांच्यासाठी मोठे आव्हान ठरू शकते.

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यातही प्रतापसिंह पाटील यांची मोठी पकड आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (शप) कडून प्रतापसिंह पाटील यांची उमेदवारी अंतिम झाल्यास, ही निवडणूक आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी अत्यंत चुरशीची आणि तगडे आव्हान देणारी ठरणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!