धाराशिव : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत आयोजित क्रीडा महोत्सव २०२६-२७ मधील खो-खो क्रीडा स्पर्धा दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी एमजीएम कृषी कॅम्पस, कृषी महाविद्यालय, गांधेली हिल्स, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत विद्यापीठांतर्गत तब्बल २७ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत कृषी महाविद्यालय आळणी, धाराशिवच्या खो-खो संघाने दमदार आणि उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघातील खेळाडूंनी सांघिक भावना, उत्तम नियोजन, वेग आणि आक्रमक खेळाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली.
संघाचे नेतृत्व संदीप चव्हाण याने केले. त्याच्यासह राज जाधव याने अतिशय उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करत संघाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले. संघातील आदित्य बुरगुटे, प्रणव मस्के, विजय खेडकर, सुशील वैद्य, यशराज चौधरी, साईराम कोकाटे, समाधान पाटील, आदित्य पाटील, प्रकाश घुगे आणि निखिल यादव या खेळाडूंनीही उत्कृष्ट सांघिक कामगिरी बजावली.
संघाला प्रा. व्ही. टी. नागरगोजे आणि डॉ. कानिफनाथ बुरगुटे यांचे व्यवस्थापन व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनामुळे संघाने स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत उपविजेतेपदापर्यंत मजल मारली.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, मार्गदर्शक करण प्रतापसिंह पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील तसेच महाविद्यालय व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.